वारकऱ्यांसह एसटीलाही पंढरीची ओढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:06 AM2021-07-18T04:06:45+5:302021-07-18T04:06:45+5:30
नागपूर : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षीसुद्धा पंढरपूरच्या वारीला महाराष्ट्र शासनाने परवानगी नाकारली आहे. नागपूरसह विदर्भातून हजारो भाविक पंढरपूरची वारी ...
नागपूर : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षीसुद्धा पंढरपूरच्या वारीला महाराष्ट्र शासनाने परवानगी नाकारली आहे. नागपूरसह विदर्भातून हजारो भाविक पंढरपूरची वारी करतात. परंतु, परवानगी नसल्यामुळे त्यांना वारी करता येणार नाही, याचे त्यांना दु:ख आहे. पंढरपूरच्या वारीमुळे एसटी महामंडळालाही मोठे उत्पन्न होते. मात्र, बसच जाणार नसल्यामुळे या वर्षीसुद्धा एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाला १३ लाख ८५ हजारांचा फटका बसणार आहे.
दरवर्षी जायच्या २१ बस
एसटी महामंडळाच्या नागपूर विभागातून दरवर्षी पंढरपूरसाठी २१ बस सोडण्यात येत होत्या. एकूण ३७ हजार ८६९ किलोमीटरचे अंतर या बस पूर्ण करीत होत्या. त्याद्वारे एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाला १३ लाख ८५ हजार ३३३ रुपये उत्पन्न मिळत होते. परंतु, पंढरपूरच्या वारीलाच परवानगी नाकारण्यात आल्यामुळे एसटीला हे उत्पन्न मिळणार नसल्याची स्थिती आहे.
तीन हजारांवर प्रवासी करीत होते वारी
पंढरपूरच्या वारीसाठी नागपूरसह विदर्भातून हजारो प्रवासी जातात. वारीसाठी बहुतांश भाविक एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करण्याला प्राधान्य देतात. परंतु, कोरोनामुळे वारीलाच परवानगी नाकारण्यात आल्यामुळे भाविकांचा नाइलाज झाला आहे. एकट्या नागपूर विभागातून ८ जुलै ते २९ जुलै २०१९ दरम्यान ३७७६ भाविकांनी पंढरपूरसाठी प्रवास केल्याची नोंद एसटी महामंडळाने केली आहे.
यंदा एकही पालखी नाही
पंढरपूरच्या वारीसाठी एसटी महामंडळाच्या वतीने ज्यादा बस सोडण्यात येतात. परंतु, कोरोनामुळे वारीला परवानगी नसल्यामुळे यंदा एसटी महामंडळाच्या नागपूर विभागातून एकही बस पंढरपूरसाठी सोडण्यात येणार नाही. त्यामुळे भाविकांसाठी या वर्षी एसटी बस उपलब्ध राहणार नाहीत.
परंपरा मोडित काढायला नको होती
‘दरवर्षी होणारी वारी या वर्षी झाली नाही. शासनाने वारीला जाण्यासाठी परवानगी देण्याची गरज नव्हती. ५०० ऐवजी किमान चार ते पाच लोकांना जाऊ द्यावे, अशी मागणी होती. रात्री वारी करून गावाच्या बाहेर थांबण्याची आमची तयारी होती. वारी चुकू न देणे हे वारकऱ्याचे ध्येय असते. शासनाने या ध्येयात अडथळा आणला. शासनाने परंपरा मोडीत काढायला नको होती.’
-सनत गुप्ता, वारकरी
धर्मावर आघात करू नये
‘पंढरपूरच्या वारीला ७०० वर्षांची परंपरा आहे. ३६० वर्षे तुकोबांच्या पायी वारीला झाले आहेत. वारीला जाता आले नाही याचे दु:ख आहे. मंदिरातून धर्मजागरण चालते. मंदिरही बंद असल्यामुळे भाविकांची निराशा झाली आहे. शासन धर्मावरच आघात करीत आहे.’
श्रीरामपंत जोशी, वारकरी
एसटीला १४ लाखांचे नुकसान
‘कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी आषाढी एकादशी यात्रा रद्द करण्याचे शासनाने ठरविले आहे. त्यामुळे नागपूर विभागाला अंदाजे १४ लाख रुपयांच्या उत्पन्नापासून वंचित राहावे लागणार आहे.’
-नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, नागपूर विभाग
............