पं. कुमार गंधर्व जन्म शताब्दी: संगीत महोत्सवाचा थाटात समारोप, शास्त्रीय सुरावटींची रसाळ मेजवानी ठरला ‘कालजयी’

By नरेश डोंगरे | Published: February 18, 2024 10:50 PM2024-02-18T22:50:11+5:302024-02-18T22:52:35+5:30

शनिवारी सायंकाळी या महोत्सवाला प्रारंभ झाला होता. आजच्या दुसऱ्या आणि समारोपीय दिवसाला प्रसिद्ध शास्त्रीय गायिका सावनी शेंडे यांनी राग पुरिया धनश्री मध्ये विविध बंदिशी सादर करून श्रोत्यांची प्रचंड दाद मिळवली.

Pandit Kumar Gandharva's birth centenary music festival ends grandly, 'Kaljayi' turns out to be a rich feast of classical music | पं. कुमार गंधर्व जन्म शताब्दी: संगीत महोत्सवाचा थाटात समारोप, शास्त्रीय सुरावटींची रसाळ मेजवानी ठरला ‘कालजयी’

फोटो : शास्त्रीय गायिका सावनी शेंडे गायन करताना

       
नागपूर : शास्त्रीय संगिताची रुची असलेल्या श्रोत्यांसाठी नागपुरात दोन दिवसांपासून सुरू असलेला ‘कालजयी’ महोत्सव रसाळ संगीताची मेजवानी ठरला. आज या संगीत महोत्सवाचा समारोप झाला.

शनिवारी सायंकाळी या महोत्सवाला प्रारंभ झाला होता. आजच्या दुसऱ्या आणि समारोपीय दिवसाला प्रसिद्ध शास्त्रीय गायिका सावनी शेंडे यांनी राग पुरिया धनश्री मध्ये विविध बंदिशी सादर करून श्रोत्यांची प्रचंड दाद मिळवली.

प्रसिद्ध शास्त्रीय गायक पद्मविभूषण पं. कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कुमार गंधर्व प्रतिष्ठान व सप्तक, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कालजयी’ या दोन दिवसीय शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन केले होते. दोन्ही दिवस कलावंतांच्या सादरीकरणाने श्रोते अक्षरश: चिंब झाले. गायिका सावनी शेंडे यांनी राग पुरिया धनश्रीने आज सुरूवात केली. त्यांनी विलंबित एकतालात निबद्ध बंदिश ‘केसर रंग श्याम छाई’ सादर करून सभागृहातील वातावरण भारावून टाकले. तबल्यावर संदेश पोपटकर, संवादिनीवर श्रीकांत पिसे आणि तानपु-यावर वैष्णवी भालेराव तसेच वल्लरी मांडवगणे यांनी त्यांना साथ दिली. कलापिनी कोमकली यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला.

बनारस घराण्याचे युवा शास्त्रीय गायक बंधू डॉ. प्रभाकर व डॉ. दिवाकर कश्यप यांचे गायन झाले. राग गोरख कल्याण मध्ये निबद्ध विलंबित एकतालातील रचना ‘कैसे धीर धरू नाथ तुमरे बिन’ आणि त्यानंतर मध्य लय तीन तालातील बंदिश ‘कजरारे कारे’ सादर केली. संवादिनीवर श्रीकांत पिसे, तबल्यावर रामेंद्र सिंग सोलंकी, तानपु-यावर भरत बिदुवा व शुभम ठाकूर यांनी उत्तम साथ दिली. भुवनेश कोमकली यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला. महोत्सवाचा समारोप जयपूर-अतरौली घराण्याच्या प्रसिद्ध शास्त्रीय गायिका श्रुती सडोलीकर यांच्या गायनाने झाला. त्यांच्या गायकीलाही रसिकांनी भरभरून दाद दिली.

कार्यक्रमाला ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार, पं. सतीश व्यास, डॉ. साधना शिलेदार, निवृत्त न्या. विकास सिरपूरकर यांच्यासह संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर यांनी केले. महोत्सवाला यशस्वी करण्याकरीता श्रीकांत देशपांडे, नितीन सहस्त्रबुद्धे, प्रदीप मुन्शी, रवी डोंगरे, अॅड. गौरव बेलसरे, डॉ. उदय गुप्ते, विलास मानेकर, उदय पाटणकर यांनी परिश्रम घेतले.

कुमारजींच्या सांगीतिक योगदानावर चर्चा
‘कालजयी’ अंतर्गत रविवारी सकाळी सायंटिफिक सभागृहात 'कुमारजींच्या सांगीतिक योगदान’ विषयावर चर्चासत्र पार पडले. यात डॉ. साधना नाफडे, पं. सतीश व्यास व केशव चैतन्य कुंटे यांनी सहभाग नोंदवला. स्वतःची गायकी समृद्ध करतानाच पं. कुमार गंधर्व यांनी संगीताच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला, असे डॉ. साधना शिलेदार म्हणाल्या. ग्वाल्हेर घराण्याचे असूनसुद्धा कुमारजींनी स्वतःची स्वतंत्र शैली तयार केली होती. गाण्यातील टोन्स, रागांचे प्रोफाइल, स्वरांची घनता, वेगवेगळ्या व्हॉल्युम्स याचा त्यांनी शोध घेतला आणि अभ्यास केला. लोकसंगीताला शास्त्रीय संगीताशी जोडून त्यांनी ११ रागांची निर्मिती केली. लोकसंगीताची धून यातून रागनिर्मितीची प्रेरणा मिळाल्याने ते धून-उगम राग म्हणवले गेले, असेही त्या म्हणाल्या.

पं. सतीश व्यास यांनी कुमार गंधर्व हे असामान्य प्रतिभेचे धनी असल्याचे म्हटले. त्यांची शिस्त, तत्व, प्रेमळ स्वभाव, लोकांमध्ये केवळ चांगले तेच बघण्याचा त्यांचा गुण त्यांना असामान्य बनविणारा ठरला. केशव चैतन्य कुंटे यांनी 'हे मोहना कान्हा' ही मराठी बंदीश ऐकवून कुमारजींनी निर्माण केलेले राग आणि त्यामागचा विचार यावर प्रकाश टाकला. कुमार गंधर्व यांच्या देहबोलीतून गाण्याबद्दलचा त्यांचा विचार व्यक्त व्हायचा, असेही ते म्हणाले. यावेळी चैतन्य कुंटे, पद्मश्री उमाकांत गुंदेचा, भुवनेश कोमकली, कलापिनी कोमकली आदी उपस्थित होते.

Web Title: Pandit Kumar Gandharva's birth centenary music festival ends grandly, 'Kaljayi' turns out to be a rich feast of classical music

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.