वनविभाग ट्रान्झिट ट्रीटमेंट सेन्टरमधून खवले मांजर निसर्गमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 20:54 IST2020-08-26T20:53:26+5:302020-08-26T20:54:58+5:30
वनविभागाच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेन्टरमध्ये उपचार सुरू असलेले एक खवले मांजर मंगळवारी निसर्गमुक्त करण्यात आले. अशाप्रकारे सेंटरमधून आतापर्यंत उपचार करून पाच खवले मांजरांना निसर्गमुक्त करण्यात विभागाला यश आले आहे. या पाचपैकी तस्करविरोधात कारवाईत सापडलेले दोन तर रेस्क्यू करून पकडलेल्या तीन मांजरांचा समावेश आहे.

वनविभाग ट्रान्झिट ट्रीटमेंट सेन्टरमधून खवले मांजर निसर्गमुक्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वनविभागाच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेन्टरमध्ये उपचार सुरू असलेले एक खवले मांजर मंगळवारी निसर्गमुक्त करण्यात आले. अशाप्रकारे सेंटरमधून आतापर्यंत उपचार करून पाच खवले मांजरांना निसर्गमुक्त करण्यात विभागाला यश आले आहे. या पाचपैकी तस्करविरोधात कारवाईत सापडलेले दोन तर रेस्क्यू करून पकडलेल्या तीन मांजरांचा समावेश आहे.
मंगळवारी सायंकाळी सर्पमित्रांनी एक खवले मांजर रेस्क्यू करून ट्रांझिट सेंटरमध्ये आणले होते. त्याची तपासणी करून वैद्यकीय प्रमाणपत्र घेऊन त्याला त्याच्या अधिवासात सोडण्यात आले. खवल्या मांजराची शिकार आणि त्याच्या खवल्यांच्या तस्करीचे प्रमाण खूप वाढले आहे. खापा आणि कळमेश्वर भागात झालेल्या कारवाईत अशाप्रकारे खवले मांजर ताब्यात घेण्यात आले. याशिवाय वनविभागाच्या पथकाने दिघोरी, हिंगणा एमआयडीसी आदी ठिकाणांहून मांजर रेस्क्यू करून ट्रांझिट सेंटरमध्ये आणले होते. त्यांच्यावर उपचार करून त्यांना त्यांच्या अधिवासात सोडण्यात आले.
वाघापेक्षा अधिक मागणी
महाराष्ट्र वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य व मानद वन्यजीव संरक्षक कुंदन हाते यांनी दिलेल्या माहितीनुसार खवले मांजराची विदर्भातून मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. हा दिसायला भीतीदायक वाटत असला तरी निरुपद्रवी आहे आणि मुंग्या खाऊन जगणारा प्राणी आहे. त्याच्या खवल्यांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण अधिक असल्याने वैद्यकीय मूल्य अधिक असल्याचे बोलले जाते. त्यामुळे विदेशात त्याची मागणी आहे. एका अंदाजानुसार वाघापेक्षा त्याची मागणी अधिक असून मोठ्या प्रमाणात त्यांना पकडून तस्करी केली जाते. मात्र वाघाकडे लक्ष देताना इतर प्राण्यांकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. नागरिकांनी अशाप्रकारे तस्करी निदर्शनास आली तर वनविभागाला सूचना करण्याचे आवाहन त्यांनी केले.