खवल्या मांजराची शिकार, दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 08:33 PM2020-05-20T20:33:20+5:302020-05-20T20:36:23+5:30
वन्यजीवांच्या यादीमध्ये दुर्मिळ असलेल्या खवल्या मांजर या प्राण्याची शिकार केल्याची घटना पेंच व्याघ्र प्रकल्पात घडली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून शिजविण्यास घातलेला हा प्राणीही जप्त करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वन्यजीवांच्या यादीमध्ये दुर्मिळ असलेल्या खवल्या मांजर या प्राण्याची शिकार केल्याची घटना पेंच व्याघ्र प्रकल्पात घडली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून शिजविण्यास घातलेला हा प्राणीही जप्त करण्यात आला आहे.
पेंच व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या चोरबाहुली वनपरिक्षेत्रात किरंगीसर्रा उत्तर कक्ष क्रमांक ५५४ मध्ये हा प्रकार उघडकीस आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावाशेजारील भागात गस्त वाढविण्यात आली आहे. या माध्यमातूनच वनविभागाला या गुन्ह्याची माहिती मिळाली. १८ मे रोजी किरंगीसर्रा या गावातील काही इसमांनी खवले मांजर (अनुसूची एक) या वन्यप्राण्याची शिकार केल्याची गोपनीय माहिती पूर्व पेंच वनपरिक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांना मिळाली. या गोपनीय माहितीच्या आधारे तपास केला असता गावाजवळच्या राजू रामजी धुर्वे यांच्या शेतातील घराच्या बाहेर खवल्या मांजर चुलीवरच्या पातेल्यामध्ये शिजवत घातल्याचे दिसून आले. वनविभागाच्या पथकाने पातेल्यासह प्राणी जप्त करून राधेश्याम ओडगू आहाके, कवडू उदाराम धुर्वे यांना चौकशीकरिता ताब्यात घेतले. प्राण्याची शिकार करून त्याचे मांस खाण्यासाठी तयारी केल्याची कबुली या आरोपींनी दिली. त्यावरून दुसऱ्या दिवशी दोघांवरही भारतीय वन अधिनियम १९२७ व वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी चोरबाहुली प्रदीप संकपाळ, प्रतीक मोडवान आणि मंगेश ताटे हे करत आहेत.