मुक्या वासराच्या प्राक्तनात वेदनांची लक्तरे
By Admin | Published: May 22, 2017 01:56 AM2017-05-22T01:56:53+5:302017-05-22T01:56:53+5:30
प्राण हा प्राणच असतो. तो व्यक्तीचा असो वा वासराचा त्याचे मोल कमी-जास्त ठरत नाही. परंतु कायम
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्राण हा प्राणच असतो. तो व्यक्तीचा असो वा वासराचा त्याचे मोल कमी-जास्त ठरत नाही. परंतु कायम कायद्याच्या परिघातच वावरणाऱ्या पोलिसांच्या लेखी मात्र व्यक्तीच्या जीवाला मोल आहे वासराच्या जीवाला अजिबातच नाही. याची दु:खद प्रचिती रविवारी अंबाझरी मार्गावर आली. एका भरधाव कारने गाईच्या दीड वर्षीय वासराला चिरडले. तो रस्त्यावर तडफडत अखेरचे श्वास मोजत असताना एका प्राणिप्रेमी महिलेला दिसले. तिने पोलिसांना कळवले. परंतु पोलिसांनी आपल्या स्वभावानुसार या घटनेला क्षुल्लक ठरवून त्या महिलेलाच प्रचंड मनस्ताप दिला.
ती महिला रात्री उशिरापर्यंत किट्ट अंधारात त्या मृत वासराजवळच बसून होती. पाषाणहृदयी पोलिसांच्या मनात कधी तरी संवेदना जागेल, या प्रतीक्षेत.
अंबाझरीकडून विद्यापीठाकडे जाणाऱ्या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यात अनेक माणसे व जनावरांना गंभीर ईजा झाली आहे. रविवारी एक वासरू या अपघातसत्राचे बळी ठरले. सेव्ह स्पीचलेस आॅर्गनायझेशनच्या संस्थापिका स्मिता मिरे यांना तडफडत प्राण सोडणारे वासरू दिसले. त्यांनी गाडी थांबवून १०० क्रमांकावर पोलिसांना फोन केला. पोलिसांनी अर्ध्या तासात येतो असे सांगितले. पण, दीड तास झाला तरी कुणीच मदतीला आले नाही. अखेर त्यांनी वृत्तपत्र प्रतिनिधीला फोन केला. तेव्हा कुठे पोलिसांची यंत्रणा हलली. अंबाझरी पोलीस पोहोचले खरे, पण त्यांनी वासराच्या मृत्यूबाबत कुठला कायदा नसल्याचे सांगत गुन्हा नोंदविण्यास नकार दिला. वासराचा मृतदेह हलवायचा असेल तर स्वत:च पैसे खर्चून वाहन करा, असा ‘कायेदशीर’ सल्लाही त्यांनी दिला. स्मिता मिरे यांनी हा अपघात कसा दखलपात्र आहे, हे समजावून सांगितल्यावरही पोलीस बधायला तयार नव्हते.
दरम्यान, गर्दीतील कुणीतरी पीपल फॉर अॅनिमल या संस्थेला फोन केला. त्यांची एक महिला प्रतिनिधी आली. परंतु तिनेही पोलिसांची बाजू घेत वेळ मारून नेली. रात्री १० वाजले तरी वासराचा मृतदेह हलवायला पोलीस तयार नव्हते.