राजकीय आणि न्यायव्यवस्थेवर प्रस्थापितांची दहशत : रेखा ठाकूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 12:33 AM2018-01-14T00:33:40+5:302018-01-14T00:37:31+5:30
प्रस्थापित जातीविरोधात छेडछाड केली तर कायदा हातात घेऊन धडा शिकवू, असा संदेश देणारी ही मनुवादी व्यवस्था आहे. यावरून राजकीय व न्यायव्यवस्थेवर आजही प्रस्थापितांची दहशत असून पोलीस यंत्रणा व प्रशासकीय व्यवस्था त्यांच्यानुसारच काम करीत असल्याचे मनोगत प्रसिद्ध विचारवंत रेखा ठाकूर यांनी व्यक्त केले.
लोेकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोपर्डीच्या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात आली. एका मुलीला न्याय मिळाला याचा आनंद आहेच. साक्षीदार नसूनही वर्चस्व असलेल्या जातीच्या मूकमोर्चामुळे या घटनेत न्याय मिळाला. दुसरीकडे अनेक साक्षीदार असूनही खर्डा येथील नितीन आगेच्या आरोपींना सबळ पुराव्याअभावी सोडून देण्यात आले. या न्यायात समता नाही. प्रस्थापित जातीविरोधात छेडछाड केली तर कायदा हातात घेऊन धडा शिकवू, असा संदेश देणारी ही मनुवादी व्यवस्था आहे. यावरून राजकीय व न्यायव्यवस्थेवर आजही प्रस्थापितांची दहशत असून पोलीस यंत्रणा व प्रशासकीय व्यवस्था त्यांच्यानुसारच काम करीत असल्याचे मनोगत प्रसिद्ध विचारवंत रेखा ठाकूर यांनी व्यक्त केले.
संत चोखामेळा समाज (एस.सी.एस.) मुलींची शिक्षण संस्थाच्यावतीने आयोजित एस.सी.एस. व्याख्यानमालेला शनिवारी रेखा ठाकूर याच्या व्याख्यानाने सुरुवात झाली. व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा. रणजित मेश्राम हे होते. याप्रसंगी प्रसिद्ध विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे, संस्थेचे सचिव पवन गजभिये, सदस्या वत्सलाबाई मेश्राम, दिगंबर हिरेखण, संदीप डोंगरे, कार्यक ारी मुख्याध्यापिका शारदा गेडाम, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका अंजली मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते.
‘महात्मा जोतिराव फुले ते कोपर्डी व्हाया खर्डा’ या विषयावर रेखा ठाकूर यांनी विचार मांडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वगळता महात्मा फुले यांचा वारसा कुणीही प्रामाणिकपणे चालविला नाही. महात्मा फुले व सावित्रीबार्इंनी बहुजनांच्या अधोगतीचे कारण असलेल्या मनुवादी व्यवस्थेविरोधात सत्यशोधक चळवळ उभी केली. त्यांच्यानंतर ब्रिटिशांच्या राजवटीत ब्राह्मण समाजसुधारकांनी काळाची पावले ओळखून आणि केवळ प्रशासनात वर्चस्व प्राप्त करण्यासाठी मुलांना व स्त्रियांना शिक्षणासाठी प्रवृत्त केले. हा महात्मा फुलेंच्या विचारांचा प्रवाह असला तरी यात बहुजन समाज व त्यातील स्त्रियांना स्थान दिले नाही. यानंतर ब्राह्मणेत्तर समाजसुधारकांनी महात्मा फुल्यांचा वारसा स्वीकारला खरा, मात्र त्यात सत्यशोधक विचारांची समतावादी भूमिका नव्हती. कारण पारंपरिक वर्चस्वाच्या भावनेतून वर्णव्यवस्थेची उतरंड तोडायची नव्हती. पुढे या चळवळीने सत्ताकारणाचे ध्येय स्वीकारत चळवळ संपविली. दलित व बहुजन समाजाला सोईस्करपणे परिघाबाहेर ठेवून स्वातंत्र्यानंतर ५० वर्षे सत्ता उपभोगली. ही सत्ता केवळ घराणेशाहीपुरती मर्यादित राहिली व सामान्य मराठा समाज भरडला गेला. कोपर्डीच्या घटनेतून सामान्य समाजाचा असंतोष उफाळला. मात्र दुर्दैवाने यामागेही समता व बंधुत्वाची प्रेरणा नव्हती तर हा असंतोष आरक्षण व अॅट्रासिटी विरोधातच गेला.