सायकोमुळे रेल्वे स्थानक परिसरात दहशत; तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी
By नरेश डोंगरे | Published: April 8, 2024 11:34 PM2024-04-08T23:34:03+5:302024-04-08T23:34:12+5:30
चुकून कुणी त्याच्या जवळ आले किंवा त्याच्या जवळून कुणी जाताना त्याला दिसले की त्या व्यक्तीच्या अंगावर धावून जातो. त्याचा गळा दाबून असंबंध बरळतो.
नागपूर : रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारा समोरच्या परिसरात घुटमळणाऱ्या एका सायकोमुळे गेल्या काही दिवसांपासून नागपूर रेल्वे स्थानक परिसरात चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. कुणी जवळ आले किंवा जवळून जाताना दिसले की तो त्या व्यक्तीच्या अंगावर धावतो अन् त्याचा थेट गळा दाबण्याचा प्रयत्न करतो.
अंदाजे तीस वर्षांचा हा मणोरुग्ण फाटके, मळकट कपडे घालून दिसतो. त्याच्या चेहऱ्यावरही जखम आहे. मुख्य प्रवेशद्वाराजवळ दिवसभर घुटमळतो.
चुकून कुणी त्याच्या जवळ आले किंवा त्याच्या जवळून कुणी जाताना त्याला दिसले की त्या व्यक्तीच्या अंगावर धावून जातो. त्याचा गळा दाबून असंबंध बरळतो. रविवारी असाच एक सैन्याचा जवान त्याच्या जवळून जात असताना हा मणोरुग्ण त्याच्या अंगावर धावून गेला आणि त्याने जवानाचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला.
जवानाने प्रारंभी त्याला झटकले मात्र तो पुन्हा अंगावर येत असल्याचे पाहून त्याचे कान चांगल्या प्रकारे शेकले. त्यानंतर मात्र हा मणोरुग्ण पळून गेल्याचे सांगितले जाते. आज पुन्हा तो रेल्वे स्थानकाच्या बाह्य परिसरात वेड्यासारखे चाळे करताना आढळला. त्याच्या उपद्रवामुळे ऑटोवाले, कुली यांच्यातही दहशत निर्माण झाली आहे. त्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.