नागपुरातील दाभा परिसरात बिबट्याची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 08:59 PM2018-03-30T20:59:27+5:302018-03-30T21:01:04+5:30
गोरेवाडा जंगलाला लागून असलेल्या दाभा परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याने दहशत पसरवली आहे. दरम्यान वन विभागानेसुद्धा परिसरातील नागरिकांना सायंकाळच्या सुमारास घराबाहेर पडू नका, अशा सूचना दिलेल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गोरेवाडा जंगलाला लागून असलेल्या दाभा परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याने दहशत पसरवली आहे. दरम्यान वन विभागानेसुद्धा परिसरातील नागरिकांना सायंकाळच्या सुमारास घराबाहेर पडू नका, अशा सूचना दिलेल्या आहेत.
गोरेवाडा जंगलाची सुरक्षा भिंत दाभा परिसरातील न्यू शांती ले-आऊट, मडावी ले-आऊटच्या जवळपास ६० ते ७० मीटर अंतरावर आहे. भिंतीची उंची केवळ आठ फूट असून गेल्या पाच दिवसांपासून येथे बिबट ठिय्या आढळून आला आहे. सुरक्षा भिंतीवर दोन ते तीन तास बिबट बसून असल्याचा व्हिडिओसुद्धा काही नागरिकांनी तयार केला आहे. त्याला हाकलून लावण्यासाठी काहींनी दगडाचा माराही केला. मात्र तो जागचा हालला नाही. याबाबत वन अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले. वन विभागाच्या कर्मचाºयांनी गुरुवारी बिबट्याचा शोधही घेतला परंतु तो कुठेच आढळून आला नाही. परिसरातील नागरिकांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना करून ते निघून गेले.
वनमंत्र्यांना कळविले
या प्रभागाच्या नगरसेविका दर्शनी धवड यांना बिबट्याबाबत माहिती कळताच त्यांनी नागिरकांची बैठक घेतली. त्यांनी स्वत: या बिबट्याला पाहिले, तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्यांनी लगेच वन कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. तसेच थेट वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही फोन करून संपूर्ण माहिती दिली. मुनगंटीवार यांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेत सुरक्षा भिंतीची उंची वाढवण्याचे आश्वासन दिले.