नृत्याविष्काराने रंगली ‘पैंजनिया बोल’ स्पर्धा
By admin | Published: November 12, 2014 12:57 AM2014-11-12T00:57:01+5:302014-11-12T00:57:01+5:30
क्लासिकल, सेमीक्लासिकल, युगुल व फोक डान्स स्पर्धेतून सादर करण्यात आलेल्या भन्नाट कल्पना आणि अंगभूत कलागुणांच्या सादरीकरणांमुळे ‘पैंजनिया बोल’ नृत्यस्पर्धेची अंतिम फेरी रंगली.
रॉक, हिपपॉपसोबतच शास्त्रीय नृत्य : नृत्यातही वापरली भन्नाट कल्पना
नागपूर : क्लासिकल, सेमीक्लासिकल, युगुल व फोक डान्स स्पर्धेतून सादर करण्यात आलेल्या भन्नाट कल्पना आणि अंगभूत कलागुणांच्या सादरीकरणांमुळे ‘पैंजनिया बोल’ नृत्यस्पर्धेची अंतिम फेरी रंगली. बाल व युवा कलावंताच्या कलाविष्काराने प्रेक्षक भारावून गेले होते. लोकमत युवा नेक्स्ट, कॅम्पस क्लब व हार्मोनी इव्हेंटसच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या एकाचवेळी विविध नृत्य प्रकारातील स्पर्धेला बाल सोबतच युवा कलावंतांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ६ ते १४ आणि १५ ते ३० या वयोगटातील ३०० वर स्पर्धक प्राथमिक फेरीत सहभागी झाले होते. अंतिम फेरीत प्रत्येक कलावंतांच्या नृत्य शैलीचा कस लागला. या स्पर्धेमुळे हल्ली गाजत असलेल्या रॉक डान्स, हिपपॉप, फ्री स्टाईल, डिस्को या गजबजाटात शास्त्रीय नृत्याने आपली ओळख कायम ठेवल्याचे दिसून आले. यात कलावंतांच्या नृत्यातील सच्चेपणा समोर आला. स्पर्धेत सोलो डान्समध्ये प्युअर क्लासिकलमध्ये भरतनाट्यम, कथ्यक, मोहीअहम, कुचीपुडी, सेमी क्लासिकलमध्ये फिल्मी, भजन, नॉन फिल्मी, ड्युएटमध्ये क्लासिकल, सेमिक्लासिकल आणि फोक डान्स, ग्र्रुपमध्ये क्लासिकल, सेमी क्लासिकल आणि फोक डान्सचा समावेश होता. प्रत्येक नृत्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत होता. विशेष म्हणजे, नृत्यातही कल्पनेचा वापर करण्यात आल्याने स्पर्धा चुरशीची ठरली.
स्पर्धेचे बक्षीस वितरण व्हीएनआयटी महाविद्यालयाचे धर्मेश पराते, रॉयल डेव्हल्पर्सच्या संचालिका सोनाली धोंडारकर व हार्मोनी इव्हेंट्सचे संचालक राजेश समर्थ यांच्या हस्ते झाले. परीक्षकांची जबाबदारी निशा ठाकूर व कुणाल कोंढालकर यांनी पार पडली. संचालन बालकलावंत अंश रंधे यांनी केले. तब्बल पाच तास चाललेल्या या स्पर्धेत प्रेक्षकांची उपस्थिती लक्षणीय होती.(प्रतिनिधी)