नागपुरातील राहुल आग्रेकर हत्याकांडातील आरोपी पंकज हारोडेच्या पोलिसांनी कोलकात्यात आवळल्या मुसक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 03:04 PM2017-11-30T15:04:45+5:302017-11-30T15:13:55+5:30
लॉटरी व्यावसायिक राहुल सुरेश आग्रेकर यांचे एक कोटीच्या खंडणीसाठी अपहरण करून त्यांची हत्या करणाऱ्या आरोपींपैकी पंकज हारोडे नामक आरोपीला कोलकाता (हावडा) येथे अटक करून पोलिसांनी गुरुवारी सकाळी नागपुरात आणले.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : लॉटरी व्यावसायिक राहुल सुरेश आग्रेकर यांचे एक कोटीच्या खंडणीसाठी अपहरण करून त्यांची हत्या करणाऱ्या आरोपींपैकी पंकज हारोडे नामक आरोपीला कोलकाता (हावडा) येथे अटक करून पोलिसांनी गुरुवारी सकाळी नागपुरात आणले.
नागपूर-विदर्भात प्रचंड खळबळ उडवून देणारे हे प्रकरण २१ नोव्हेंबरला घडले होते. विदर्भातील मोठे लॉटरी व्यावसायिक समजल्या जाणाऱ्या सुरेश आग्रेकर यांना राहुल आणि जयेश नामक दोन मुले होती. त्यातील राहुल (वय ३७) हा २१ नोव्हेंबरला सकाळी ८. ३० वाजता एक-दीड तासात परत येतो, असे सांगून घराबाहेर गेला. काही अंतर पायी चालत गेल्यानंतर राहुल एका बोलेरोसारख्या वाहनात बसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी बघितले. दुपार झाली तरी परतले नाही म्हणून त्यांची पत्नी अर्पिता यांनी राहुलला फोन केला. यावेळी त्यांनी दीडएक तासात येतो, असे सांगितले. त्यानंतर २ वाजून ८ मिनिटांनी जयेश आग्रेकर यांच्या मोबाईलवर फोन आला. फोन करणाऱ्याने आम्ही राहुलचे अपहरण केले. त्यांना सुखरूप सोडवून घ्यायचे असेल तर एक कोटी रुपयांची खंडणी द्यावी लागेल, असे सांगितले. यासंबंधाने कुणाकडे वाच्यता केल्यास अथवा पोलिसांकडे तक्रार नोंदवल्यास गंभीर परिणाम होतील, अशी धमकीही मोबाईलवर बोलणाऱ्याने दिली. एक कोटींच्या खंडणीसाठी राहुलचे अपहरण झाल्याचे कळाल्याने आग्रेकर यांनी एकाच वेळी गुन्हे शाखा आणि लकडगंज पोलीस ठाण्यात संपर्क साधला. तेथे तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली.
पोलीस चौकशी करीत होते तर तिकडे दुर्गेश आणि पंकज हारोडे यांनी त्यांच्या साथीदारांच्या मदतीने राहुलला जिवंतपणी पेटवून देऊन त्याची हत्या केली. दुसºया दिवशी हा थरारक प्रकार उघडकीस आल्यापासून नागपूर-विदर्भात प्रचंड खळबळ उडाली होती. या हत्याकांडाला ८ दिवस झाले तरी आरोपींचा छडा लागत नसल्यामुळे पोलिसांवर प्रचंड दडपण आले होते. आरोपी मध्यप्रदेश, छत्तीसगड, झारखंड आदी राज्यात पोलीस पथके आरोपींचा शोध घेत होते. दरम्यान, बुधवारी सकाळी आरोपींचे लोकेशन हावडा (कोलकाता) येथे असल्याचे कळाल्यानंतर गुन्हे शाखेचे पथक बुधवारी सायंकाळी कोलकात्यात पोहचले आणि त्यांनी आरोपी पंकजच्या मुसक्या बांधल्या.
जावयाला मागितले पैसे
आरोपी पंकज आणि दुर्गेश मंगळवारी हावडा (कोलकाता) स्थानकावर पोहचले. जवळचे सर्व पैसे संपल्यामुळे आरोपी पंकजने त्याच्या नागपुरात राहणाऱ्या जावयाला बुधवारी सकाळी व्हॉटस्अॅप कॉल केला. माझ्याकडे एकही पैसा नाही. मला पैशाची फार गरज आहे, कोलकाता येथे पाठवा, असे तो म्हणाला. दरम्यान, आरोपीचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी त्याच्या सर्वच नातेवाईकांच्या हालचालीवर सूक्ष्म नजर ठेवली होती. त्यांना गुन्ह्याचे गांभीर्य समजावून सांगत आरोपींना मदत केल्यास किंवा पोलिसांसोबत लपवाछपवी केल्यास तुमच्यावरही कायदेशीर कारवाई होऊ शकते, याची कल्पना दिली होती. त्यामुळे पंकजचा व्हॉटस्अॅप कॉल येताच पोलिसांना तो कोलकाता येथे असल्याची माहिती कळाली. त्यावरून पोलिसांचे पथक बुधवारी सायंकाळी कोलकाता येथे पोहचले. त्यांनी आरोपीचे हॉटेल शोधून काढत त्याच्या रात्री तेथे मुसक्या बांधल्या. आज गुरुवारी त्याला नागपुरात आणण्यात आले.
आरोपींचे झाले भांडण
अपहरण आणि हत्याकांडासारखा गंभीर गुन्हा केल्यानंतर तब्बल ८ दिवसांपासून लपतछपत फिरणाऱ्या आरोपी पंकज आणि दुर्गेशमध्ये मंगळवारी सकाळी वाद झाला. सूत्रांच्या माहितीनुसार, हे दोघे वेगवेगळ्या ठिकाणी थांबले. बुधवारी रात्री पंकजच्या पोलिसांनी मुसक्या बांधल्या. तत्पूर्वीच आरोपी दुर्गेश तेथून पळून गेला. पंकजच्या अटकेनंतर या हत्याकांडाशी जुळलेले अनेक धक्कादायक पैलू उजेडात येणार आहे.