पंकज जुनघरे खूनप्रकरण : सर्व सहा जणांना आठ वर्षांचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 11:49 PM2019-04-03T23:49:08+5:302019-04-03T23:49:53+5:30
क्षुल्लक वादातून उद्भवलेले भांडण सोडविण्यासाठी मध्ये गेलेल्या तरुणास सहा जणांनी बेदम मारहाण केली. त्यात त्या तरुणाचा मृत्यू झाला. या खून प्रकरणात खापा (ता. सावनेर) पोलिसांनी सहा जणांना अटक केली होती. त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्याने जिल्हा सत्र न्यायाधीश रघुवंशी यांच्या न्यायालयाने सर्व आरोपींना वेगवेगळ्या कलमान्वये आठ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (सावनेर) : क्षुल्लक वादातून उद्भवलेले भांडण सोडविण्यासाठी मध्ये गेलेल्या तरुणास सहा जणांनी बेदम मारहाण केली. त्यात त्या तरुणाचा मृत्यू झाला. या खून प्रकरणात खापा (ता. सावनेर) पोलिसांनी सहा जणांना अटक केली होती. त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्याने जिल्हा सत्र न्यायाधीश रघुवंशी यांच्या न्यायालयाने सर्व आरोपींना वेगवेगळ्या कलमान्वये आठ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
पंकज गोपाल जुनघरे (२५, रा. खापा, ता. सावनेर) असे मृताचे नाव असून, आरोपींमध्ये शुभम सुरेश बावनकुळे (२२), सतीश नामदेव जथरे (२०) या दोघांसह अन्य चार विधिसंघर्षग्रस्त बालकांचा समावेश आहे. खुनाची ही घटना १० एप्रिल २०१७ रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास नवीन वस्ती खापा येथे घडली होती. १० एप्रिल रोजी हनुमान जयंती असल्याने खापा येथे शोभायात्रा काढण्यात आली होती. त्यात पंकज त्याच्या मित्रासोबत सहभागी झाला होता. दरम्यान, आरोपीपैकी एकाने पंकजच्या मित्राला धक्का मारला. त्यामुळे मित्राने आरोपीला सहज विचारणा केली.
काही वेळाने सहाही जणांनी एकत्र येत पंकजच्या मित्राला मारहाण करायला सुरुवात केली. दरम्यान, पंकज सर्वांची समजूत काढत भांडण सोडविण्यासाठी मध्ये गेला. मात्र, त्या सहाही जणांनी पंकजलाच लाथाबुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने नागरिकांनी त्याला लगेच खापा येथीन प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तिथे डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
परिणामी, खापा पोलिसांनी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास भादंवि ३०४, १४३, १४७ अन्वये गुन्हा दाखल करून सहाही आरोपींना अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापुरे यांनी संपूर्ण घटनेचा तपास पूर्ण करून दोषारोपपत्र जिल्हा सत्र न्यायाधीश रघुवंशी याच्या न्यायालयात सादर करीत प्रकरण न्यायप्रविष्ट केले. दरम्यान, सत्र न्यायाधीश रघुवंशी यांच्या न्यायालयाने दोन्ही बाजूंचे साक्षपुरावे तपासत तसेच युक्तिवाद ऐकून घेत आरोपींना दोषी ठरविले. यात आरोपींना भादंवि ०३४ अन्वये सात वर्षे, भादंवि १४७ अन्वये एक वर्ष व भादंवि १४३ अन्वये चार महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली; शिवाय तिन्ही कलमान्वये एकूण ६,६०० रुपयांचा दंड ठोठावला. दंडाच्या रकमेचा भरणा न केल्यास एकूण दोन महिने पाच दिवसांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.