पंकज, मयूरा यांनी जिंकली ‘टायगरमॅन’ ट्रायथलॉन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 12:02 PM2020-02-11T12:02:20+5:302020-02-11T12:03:23+5:30
कोल्हापूरचे पंकज रावलू आणि मयूरा शिवलकर यांनी रविवारी नागपुरात प्रथमच झालेल्या टायगरमॅन ट्रायथलॉनचे क्रमश: पुरुष आणि महिला गटात जेतेपद पटकावले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोल्हापूरचे पंकज रावलू आणि मयूरा शिवलकर यांनी रविवारी नागपुरात प्रथमच झालेल्या टायगरमॅन ट्रायथलॉनचे क्रमश: पुरुष आणि महिला गटात जेतेपद पटकावले. प्रो हेल्थ फाऊंडेशनच्यावतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
पंकजने ३ किमी जलतरण, १२० कि.मी. सायकल शर्यत आणि २५ किमी दौड ६.३६ तासात पूर्ण केली. मयूराने तिन्ही प्रकारात ९.२४ तास वेळेसह अव्वल स्थान पटकावले. नागपूरचे अभय दुरुगकर यांना ४६ ते ५५ वर्षे वयोगटात ९.५३ तासांसह तिसरे स्थान मिळाले. ५५ वर्षांंवरील वयोगटात नागपूरचेच रवींद्र तरारे यांनी ९.३६ तास वेळेची नोंद करीत दुसरे स्थान संपादन केले. ‘माईल्स न् मायलर्स ’क्लबचे डॉ. निनाद काळे, अश्विन मोकाशी आणि मृणाल वंजारी यांनी देखील टायगरमॅन अंतर यशस्वीरीत्या पूर्ण केले. रेस पूर्ण करणाऱ्या सर्व स्पर्धकांचा टायगरमॅन पदक देऊन गौरव करण्यात आला.
या आयोजनात आॅलिम्पिक अंतराची ट्रायथलॉन घेण्यात आली. त्यात १५०० मीटर जलतरण, ४० कि.मी. सायकलिंग आणि १० किमी दौड आदींचा समावेश होता. यात नागपूरसह हुबळी, मुंबई, दिल्ली आणि कोल्हापूरचे स्पर्धक प्रामुख्याने सहभागी झाले होते. यात पुरुष गटात अहमदाबादचे मंथन पटेल ३.३ तास वेळेसह विजेते ठरले. महिलांमध्ये मुंबईच्या केतकी साठे यांनी ३.११ तास वेळेसह बाजी मारली. नागपूरची तन्वी तरारे महिलांमध्ये दुसºया आणि स्मिता काजळे तिसºया स्थानी आल्या. आॅलिम्पिक ट्रायथलॉनच्या सांघिक गटात हेमंत काळीकर अािण अनंतकृष्ण्न राजगोपाल यांच्या संघांना क्रमश: पहिले आणि दुसरे स्थान मिळाले. ७५० मीटर पोहणे, २० किमी सायकलिंग आणि ५ किमी दौड या जलद ट्रायथलॉन प्रकारात संजना जोशी आणि स्रेहल जोशी यांनी क्रमश: पहिले आणि दुसरे स्थान मिळविले. पुरुष गटात दक्ष खंते आणि श्रीजीत नायर यांनी बाजी मारली. १० कि.मी. दौड, ४० कि.मी. सायकलिंग आणि ५ कि.मी. दौड या ड्यूथलॉन प्रकारात महिलांमध्ये मंगला पाटील, श्वेता टेकरीवाल आणि सीमा कवनपुरे पहिल्या तीन स्थानांवर आल्या. पुरुष गटात प्रवीण पाटील, वैभव अंधारे आणि बलजित जुनेजा यांनी पहिल्या तीन स्थानांवर झेप घेतली.
ड्यूथलॉनच्या सांघिक गटात कविता मुंडले, रश्मी कुलकर्णी आणि अमित जाजू यांच्या नेतृत्वाखालील संघांनी क्रमश: पहिले, दुसरे आणि तिसरे स्थान मिळविले. ट्रायथलॉनचे रेस डायरेक्टर डॉ. अमित समर्थ आणि ड्यूथलॉनचे डायरेक्टर सचिन शिरबवीकर हे होते. प्रारंभी शर्यतींना वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित आणि डॉ. शांतनू सेनगुप्ता यांनी हिरवा झेंडा दाखवला. पुरस्कार वितरण राज्यसभेचे खासदार डॉ. विकास महात्मे, मेजर जनरल कुंद्रा, डॉ. संजय जैस्वाल आदींच्या उपस्थितीत करण्यात आले.