पंकजा मुंडेंनी मुख्यमंत्री व्हावे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 12:36 AM2017-09-05T00:36:48+5:302017-09-05T00:37:12+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे संरक्षणमंत्रिपद हे महिलेच्या हातात दिले आहे. महिला सक्षमीकरणाचे वारे जोरदार वाहू लागले आहे.

Pankaja Munde to be chief minister! | पंकजा मुंडेंनी मुख्यमंत्री व्हावे!

पंकजा मुंडेंनी मुख्यमंत्री व्हावे!

Next
ठळक मुद्देआशिष देशमुख यांची गणरायाकडे सदिच्छा : महिला सक्षमीकरणाचा दिला नारा

लोकमत न्यूज नेटवर्क
काटोल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे संरक्षणमंत्रिपद हे महिलेच्या हातात दिले आहे. महिला सक्षमीकरणाचे वारे जोरदार वाहू लागले आहे. त्याच पार्श्वभूमीवर बहुजन समाजातून आलेल्या पंकजा मुंडे या भविष्यात प्रगतीशील महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हाव्यात, अशी श्रीगणेशाकडे सदिच्छा व्यक्त करतो, असे विधान काटोलचे भाजपा आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी सोमवारी केले.
काटोल फेस्टिव्हलमध्ये आयोजित महिला मेळाव्यासाठी ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे आल्या होत्या. त्याप्रसंगी स्व. गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी, पंकजा मुंडे या पहिल्या बहुजन मुख्यमंत्री होण्यासाठी गणरायाला प्रार्थना करतो, असे विधान आ. देशमुख यांनी केले. या कार्यक्रमात बोलताना भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ.राजीव पोतदार यांनी महिला सक्षमीकरणाचा उल्लेख करीत केंद्रात निर्मला सीतारामन या संरक्षणमंत्री झाल्या. ही अतिशय भूषणावह बाब असल्याचे सांगितले. हाच धागा पुढे नेत आशिष देशमुख यांनी उपरोक्त विधान केले.
यावेळी पंकजा मुंडे यांनी महिला सक्षमीकरणावर भाष्य केले. महिलांच्या प्रगतीसाठी आपण प्रयत्नशील असून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे आपले ध्येय आहे. त्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहे. महिलांनीही शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाला भाजपचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर, शिक्षण सभापती उकेश चव्हाण, काटोल पंचायत समितीचे सभापती संदीप सरोदे, उपसभापती योगेश चाफले यांची प्रमुख उपस्थिती होती.
शासनाचीच भूमिका मांडली : देशमुख
दरम्यान, या वक्तव्याबाबत आशिष देशमुख यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी असे बोललो असल्याचे स्पष्ट केले. मात्र यात वादग्रस्त काहीही नाही. केंद्र आणि राज्यपातळीवर महिला सक्षमीकरणाचे धोरण प्रभावीपणे राबविल्या जात आहे. महिलांना मोठी जबाबदारी देण्यात येत आहे. संरक्षणमंत्री म्हणून निर्मला सीतारमण हे त्याचेच उदाहरण आहे. महाराष्ट्रातदेखील भविष्यात असे काही झाल्यास बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व म्हणून पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी माझी सदिच्छा आहे. मी शासनाचीच भूमिका मांडली, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Pankaja Munde to be chief minister!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.