कागदी घोडे नाचविणारी मोहीम शाळाबाह्य मुले शोधणार कशी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:06 AM2021-03-22T04:06:59+5:302021-03-22T04:06:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शिक्षण हक्क कायदा २००९ अन्वये ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालक शाळेच्या पटावर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शिक्षण हक्क कायदा २००९ अन्वये ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालक शाळेच्या पटावर नोंदविला जाणे, नियमित शाळेत येणे व त्याला दर्जेदार शिक्षण मिळणे हा बालकांचा हक्क आहे, पण स्थलांतर करणाऱ्या कुटुंबीयांची मुले, गावाबाहेरच्या वस्त्यांमध्ये राहणारी मुले अजूनही शाळाबाह्यच आहे. या संदर्भात २०१५ मध्ये महा सर्वेक्षण झाले होते. त्यानंतर, टप्प्याटप्प्याने शासनाला वाटेल, तेव्हा सर्वेक्षण करण्यात आले. मार्च महिन्याच्या पहिल्या तारखेपासून १० दिवसांची विशेष मोहीम राज्यात राबविण्यात आली होती. ही मोहीम संपून आज १० दिवस लोटल्यानंतरही मोहिमेची आकडेवारी पुढे आली नाही.
शाळाबाह्य बालकांची ही शोध मोहीम १ ते १० मार्च या कालावधीत करायची होती. लॉकडाऊन केल्यानंतर मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले. त्यात ६ ते १८ वयोगटांतील अनेक बालके शाळाबाह्य झाल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. त्यासाठी कुटुंबाचे सर्वेक्षण करण्याबरोबरच सर्वेक्षकांना गजबजलेल्या वस्त्या, रेल्वे स्टेशन, बसस्थानके, गावाबाहेरची पाल, वीटभट्ट्या, दगडखाणी, मोठी बांधकामे, स्थलांतरित कुटुंब, झोपड्या, फूटपाथ, सिग्नल व रेल्वेमध्ये वस्तू विकणारी मुले, भीक मागणारी मुले, लोककलावंतांच्या वस्त्या, अस्थायी निवारा असणारी कुटुंब, भटक्या जमाती, जंगलातील वास्तव्यास असलेली कुटुंब आदींपर्यंत पोहोचून बालकांचा शोध घ्यायचा होता. शिक्षण विभागावर ही जबाबदारी सोपविण्यात आली होती. पंचायत समितीच्या बीईओंनी त्याचे तालुक्यात नियोजन करायचे होते. मोहीम संपल्यानंतरही शाळाबाह्यची आकडेवारी विभागाने प्रसिद्ध केली नाही. त्यामुळे ही मोहीम कागदावरच राबविण्यात आली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
- शाळा बाह्य मुलांची शोध मोहीम हा शासनाचा उपक्रम होता. परंतु ही मोहीम गंभीरतेने घेतलीच नाही. सर्वेक्षणाच्या दिलेल्या कार्यक्रमानुसार आतापर्यंत जिल्ह्यातील आकडे प्रसिद्ध व्हायला हवे होते. मुळात काही ठिकाणी शिक्षक गेले तर काही ठिकाणी पोहचलेच नाही. काही शिक्षकांना मोहीम संपल्यानंतर शाळा बाह्यचा फॉरमॅट मिळाल्याची माहिती आहे. मोहिमेचे असे नियोजन असेल तर कशी मोहीम यशस्वी होणार आहे.
दीनानाथ वाघमारे, संयोजक, संघर्ष वाहिनी
- आकडेवारी गोळा करणे सुरू आहे
मोहीम यशस्वीरीत्या संपलेली आहे. पंचायत समितीतून आकडेवारी गोळा करणे सुरू आहे. लवकरच शाळा बाह्यची आकडेवारी घोषित करण्यात येईल, अशी माहिती शिक्षण विभागाकडून मिळाली.