पेपरफूट : नागपुरात असा झाला पर्दाफाश

By admin | Published: February 27, 2017 01:44 AM2017-02-27T01:44:44+5:302017-02-27T01:44:44+5:30

सैन्य दलाच्या परीक्षेचा पेपर लीक करणाऱ्या टोळीचा भंडाफोड करून पोलिसांनी निवृत्त कॅप्टनसह १० आरोपींना अटक केली.

Paperfoot: In Nagpur, busted | पेपरफूट : नागपुरात असा झाला पर्दाफाश

पेपरफूट : नागपुरात असा झाला पर्दाफाश

Next


नागपूर : सैन्य दलाच्या परीक्षेचा पेपर लीक करणाऱ्या टोळीचा भंडाफोड करून पोलिसांनी निवृत्त कॅप्टनसह १० आरोपींना अटक केली. पेपर फोडण्याचा दावा करणाऱ्यांच्या आमिषाला बळी पडलेल्या २३० परीक्षार्थ्यांनाही पोलिसांनी सकाळी ताब्यात घेतले. त्यांचा जबाब नोंदवून घेतल्यानंतर त्यांना परीक्षा केंद्रावर सोडले अन् तेथून पुन्हा गुन्हे शाखेत बोलावून या सर्वांचे जबाब नोंदविण्यात आले. त्यानंतर त्यांना पोलिसांनी क्रमश: मोकळे केले. ठाणे आणि नागपूर पोलिसांनी संयुक्तपणे शनिवारी मध्यरात्री सुरू केलेली ही खळबळजनक कारवाई रविवारी रात्रीपर्यंत सुरूच होती. विशेष म्हणजे, अशाच प्रकारची कारवाई गुजरात, गोवा आणि ठाण्यातही करण्यात आल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी लोकमतला दिली.

रविवारी, २६ फेब्रुवारीला देशातील विविध केंद्रांवर लष्कराच्या भरतीसाठी लेखी परीक्षा ठरली होती. या परीक्षेचा पेपर आमच्याकडे असून, परीक्षेच्या काही तासांपूर्वी आम्ही तो विद्यार्थ्यांना उत्तरांसह सांगणार असल्याची माहिती ‘लष्कर पेपरफूट टोळी’चा म्होरक्या संतोष शिंदे (संचालक छत्रपती अकादमी, फलटण, जि. सातारा) आणि रवींद्रकुमार या दोघांनी आपल्या दलालांसह पसरविली होती. परीक्षेला बसणाऱ्यांना उत्तीर्ण होताच नोकरी लागणार, असे आमिष दाखवून प्रत्येकासोबत हजारो, लाखोंचा सौदा केला होता. देशभरातील विविध ठिकाणांहून या टोळीच्या दलालांच्या जाळ्यात हजारो विद्यार्थी अडकले. त्यांना वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांवर परीक्षेच्या पूर्वसंध्येलाच आरोपींनी बोलावून घेतले. नागपुरात संतोष शिंदे आणि त्याच्या टोळीने बोलाविलेल्या परीक्षार्थ्यांपैकी २३० परीक्षार्थी दलालांच्या जाळ्यात अडकले. ठरल्याप्रमाणे हे परीक्षार्थी शनिवारी सायंकाळी नागपुरात आले.

ही माहिती ठाणे पोलिसांना पूर्वीच मिळाली होती. त्यामुळे ठाण्याचे एक पोलीस पथक शनिवारी दुपारीच नागपुरात आले. त्यांनी वरिष्ठांशी संपर्क साधल्यानंतर पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली या टोळीला जेरबंद करण्यासाठी कारवाई सुरू झाली. सूत्रधार संतोष शिंदे आणि सुभाष निर्मळे (निवृत्त कॅप्टन, करियर अकादमी, अकोला) या दोघांच्या फोन कॉल्सवरून त्यांचा मागोवा घेण्यात आला. मध्यरात्री आरोपी संतोष शिंदे पोलिसांच्या हाती लागला. त्यानंतर अन्य आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी शिताफीने जाळे विणले.

सभागृहात सुरू झाली रंगीत तालीम

आरोपी शिंदे आणि त्याच्या साथीदारांनी रामेश्वरी-सुयोगनगर, अजनी परिसरातील मौर्य समाज सभागृह एक दिवसासाठी ३० हजार रुपये देऊन भाड्याने घेतले होते. या ठिकाणी सैन्य दलाची परीक्षा देणाऱ्यांना बोलविण्यात आले होते. रविवारी पहाटे २ वाजतापासूनच एक एक करत परीक्षार्थी येथे यायला सुरुवात झाली. सकाळी १० वाजता रेल्वेस्थानकाजवळच्या लष्कराच्या कार्यालयात परीक्षा होणार होती. त्यापूर्वीच येथे २५० पैकी २३० परीक्षार्र्थी गोळा झाले. देवराव शिंदे नामक आरोपी त्यांना पेपरमध्ये कोणते प्रश्न येणार आणि कोणत्या प्रश्नाचे उत्तर काय आहे, ते सांगत होता. तब्बल २९ प्रश्नांची उत्तरे त्याने परीक्षार्थ्यांना सांगितली. हे सर्व प्रश्न संतोष शिंदे याच्या व्हॉट्स अ‍ॅपवर रवींद्रकुमार नामक आरोपीने पाठविले होते. तो सैन्य दलात कार्यरत असल्याचे समजते.

तेवढ्यात या सभागृहात पोलीस पथक पोहचले. त्यांनी येथे देवराव शिंदे, कॅप्टन सुभाष निर्मळे, संदीप भुजबळ, जयकुमार बेलखेडे (काटोल), संदीप सदाशिव फरकडे (पंढरपूर), प्रसाद जानराव धनोड (अहमदनगर), वैभव भास्कर शिसोदे, संदीप बबन नागरे आणि किरण अशोक गभणे (नाशिक) यांना जेरबंद केले. त्यांच्याकडून १० मोबाईल, दोन वाहने, लॅपटॉप तसेच काही रोख यासह एकूण १० लाख, २५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे सभागृहात एकच खळबळ उडाली. कारवाईची पार्श्वभूमी कळल्याने अस्वस्थ झालेल्या परीक्षार्थ्यांना धीर देऊन पोलिसांनी त्यांना वेळेच्या आत परीक्षा केंद्रावर सोडून दिले. पेपर संपल्यानंतर त्यांना जाबजबाब नोंदविण्यासाठी गुन्हेशाखेत येण्याचे सांगण्यात आले. त्यानुसार, सैन्य दलाचा पेपर संपल्यानंतर बहुतांश परीक्षार्थी गुन्हेशाखेत पोहचले. त्यांचे बयान नोंदविणे रात्रीपर्यंत सुरू होते. या प्रकरणाचा गुन्हा ठाणे पोलीस ठाण्यात दाखल असल्यामुळे संतोष भीमराव शिंदे, निर्मळेसह सर्व आरोपींना ठाणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कामगिरी रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपककुमार खोब्रागडे, पोलीस निरीक्षक गिरीश ताथोड, सहायक निरीक्षक ज्ञानेश भेदोडकर, गोकुळ सूर्यवंशी, प्रदीप अतुलकर, उपनिरीक्षक त्रिपाठी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बजावली. (प्रतिनिधी)



पेपरफुटीचे अकोला कनेक्शन

लष्कर भरतीसाठी सुरू असलेल्या प्रश्नपत्रिका परीक्षेच्या पूर्वीच फोडून ते विकण्याचे षड्यंत्र रचणाऱ्यांमध्ये अकोल्यातील करिअर अकादमीच्या संचालक सुभाष निर्मळे यांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे देश पातळीवर असलेल्या या मोठ्या रॅकेटची पाळेमुळे अकोल्यातही रुजली असल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आले आहे. अकोला तालुक्यातील कानशिवनी येथील सेवानिवृत्त कॅप्टन सुभाष निर्मळे यांच्या मालकीची करिअर अकादमी आहे. या अकादमीमध्ये स्पर्धा परीक्षेचे शिकवणी वर्ग घेण्यात येतात.

अकोल्यातील विद्यार्थी अडकले?

दोन लाख रुपयांमध्ये पेपर खरेदी-विक्रीच्या व्यवहारात अकोल्यातील काही उमेदवार

Web Title: Paperfoot: In Nagpur, busted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.