दिल्लीच्या पेपरफुटीचे नागपूरच्या विद्यार्थ्यांना टेन्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 08:56 PM2018-03-31T20:56:05+5:302018-03-31T20:56:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीचा गणित आणि अर्थशास्त्राचा पेपर फुटल्याने सीबीएसई पुन्हा फेरपरीक्षा घेणार आहे. दुबार पेपर द्यावा लागणार असल्याने विद्यार्थी टेन्शनमध्ये आले आहेत. पालकांनीही बोर्डाच्या या निष्काळजीपणावर नाराजी व्यक्त केली आहे. शिक्षकांच्या मते, पेपर दिल्लीत फुटला आहे, त्याचा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी काहीही संबंध नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेतून रिलॅक्सेशन द्यायला हवे.
दहावी आणि बारावीचे वर्ष विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असते. त्या दृष्टिकोनातून विद्यार्थी, पालक आणि शिक्षक अतिशय सजग असतात. स्पर्धेच्या युगात आपली गुणवत्ता टिकविण्यासाठी विद्यार्थीही प्रचंड मेहनत घेतात. रात्रंदिवस एक करून अभ्यास करतात. अशात झालेला पेपर पुन्हा द्यायचा असेल तर विद्यार्थ्यांवर मानसिक दडपण येते. सध्या सीबीएसई बोर्डाचे विद्यार्थी अशाच दडपणात अडकले आहेत. सीबीएसई बोर्डाच्या सुरू असलेल्या दहावीच्या परीक्षेत गणिताचा पेपर व बारावीच्या परीक्षेत अर्थशास्त्राचा पेपर फुटला आहे. बोर्डाने हे दोन्ही पेपर पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्डाने बारावीच्या अर्थशास्त्राच्या पेपरची तारीख २५ एप्रिल घोषित केली आहे तर दहावीच्या पेपरच्या बाबतीत बोर्डाने दिल्ली, हरियाणा हे दोन राज्य वगळता इतर राज्यांतील विद्यार्थ्यांना रिलॅक्सेशन दिले आहे. त्यामुळे नागपुरातील दहावीच्या विद्यार्थ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. परंतु बारावीच्या विद्यार्थ्यांना अर्थशास्त्राचा पेपर द्यायचाच आहे. त्यामुळे बारावीचे विद्यार्थी चांगलेच दडपणात आहेत.
मुलांची मानसिकता राहत नाही
मुळात सीबीएसईचे विद्यार्थी अगदी प्रामाणिकपणे अभ्यास करतात. कॉपी करणे, परीक्षेपूर्वी पेपर मिळविणे या भानगडीत ते पडतच नाही. अशात बोर्डाच्या चुकीमुळे त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना फटका बसत असेल तर ते मानसिक दडपणात जातात. एकदा पेपर दिल्यानंतर पुन्हा त्याच पेपरची तयारी करणे त्यांच्यासाठी अतिशय अवघड जाते. त्याचा परिणाम त्यांच्या गुणांवरही होऊ शकतो.
राजाभाऊ टांकसाळे, प्राचार्य, सेंट पॉल स्कूल
मुले नाराज झाली
विद्यार्थी पेपर दिल्यानंतर अतिशय आनंदी होते. त्यांना जेव्हा कळले की पेपर फुटल्याने फेरपरीक्षा घेण्यात येईल तेव्हा ते नाराज झाले होते. सीबीएसई बोर्डाने एक चांगले केले की दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यातून रिलॅक्स केले. परंतु बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावीच लागणार आहे. मुळात पेपर हा दिल्ली येथे फुटला आहे. त्याचा परिणाम इतर राज्यांत किंचीतही झाला नसेल. पण शिक्षा मात्र सर्वच विद्यार्थ्यांना मिळते आहे. बोर्डाने जसा दहावीच्या बाबतीत निर्णय घेतला तसेच निर्णय बारावीच्या विद्यार्थ्यांबाबतही घ्यायला हवा, अशी अपेक्षा आहे.
कविता नागराजन, प्राचार्य, स्कूल आॅफ स्कॉलर
आता अभ्यासाचा मूड नाही
एकदा पेपर झाल्यावर पुन्हा त्याच पेपरचा अभ्यास करणे अतिशय अवघड जाते. दिल्लीच्या चुकीचा फटका आम्हाला बसतोय. पण पर्याय नाही. पेपर तर द्यावाच लागेल. पण आता अभ्यासाचा मूड राहिलेला नाही.
रजत फडणीस, विद्यार्थी
सीबीएसईचे विद्यार्थी पोहचले गडकरींकडे
महाराष्ट्रात कुठेही पेपर फूट झालेली नाही. तरीही आम्हाला त्याचा फटका का, असा सवाल सीबीएसईच्या बारावीच्या विद्यार्थ्यांनी केंद्रीय मंत्र्यांकडेच केला आहे. शहरातील ५० ते ६० बारावीच्या विद्यार्थ्यांनी शनिवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात भेट दिली. गडकरी दौऱ्यावर असल्यामुळे त्यांना रविवारी बोलाविण्यात आले आहे. रविवारी १५० ते २०० विद्यार्थी व पालक गडकरींची भेट घेणार आहे. या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, सीबीएसई बोर्डाचा दहावीचाही पेपर फुटला होता. परंतु बोर्डाने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना रिलॅक्सेशन दिले. तसेच रिलॅक्सेशन बारावीच्या विद्यार्थ्यांनाही देण्यात यावे. वर्षभर अभ्यास करून पेपर दिला आहे. झालेल्या पेपरचा पुन्हा अभ्यास करणे अडचणीचे जाणार आहे. त्यामुळे पेपर रद्द करावा.