नागपुरात पोलीस आयुक्तांसमोर ३१७ गुंडांची ‘परेड’; दिला कायद्याचा ‘डोस’
By योगेश पांडे | Published: February 7, 2024 10:26 PM2024-02-07T22:26:28+5:302024-02-07T22:26:49+5:30
गडबड झाल्यास कठोर कारवाईचा इशारा, पोलीस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून डॉ. सिंगल हे कायदा व सुव्यवस्था आणि गुन्हेगारीचा आढावा घेण्यात व्यस्त आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच आठवड्यात पोलीस आयुक्त डॉ.रवींद्रकुमार सिंगल यांनी शहरातील शेकडो गुंडांना कायद्याचा ‘डोज’ दिला. दरोडा, खंडणी आदी गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या नागपूरच्या ३१७ गुन्हेगारांची पोलीस आयुक्तालयात परेड करण्यात आली. पुढील काळात कायदा हातात घेऊन कुठलाही गुन्हा केल्यास परिणामांना सामोरे जायची तयारी ठेवण्याचा इशारा त्यांना देण्यात आला. सुमारे साडेतीन तास चाललेल्या या परेडमुळे शहरातील गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली होती.
पोलीस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून डॉ. सिंगल हे कायदा व सुव्यवस्था आणि गुन्हेगारीचा आढावा घेण्यात व्यस्त आहेत. त्यांनी सर्व पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या क्षेत्रातील सक्रिय आणि नावाजलेल्या गुन्हेगारांची पोलिस आयुक्तालयात परेड आयोजित करण्याच्या सूचना केल्या होत्या. यानुसार ठाणेदार आणि गुन्हे शाखेचे अधिकारी आपापल्या भागातील ३१७ गुन्हेगारांसह पोलिस आयुक्तालयात पोहोचले. पोलीस आयुक्त डॉ. सिंगल यांनी सहायक आयुक्त अश्वती दोरजे, गुन्हे शाखेचे उपायुक्त निमित गोयल, संबंधित झोनचे डीसीपी आणि ठाणेदार यांच्या उपस्थितीत प्रत्येक गुन्हेगाराशी प्रत्यक्ष बोलणे केले.
प्रत्येक गुन्हेगारावर पोलिसांची नजर असल्याचे त्यांनी गुन्हेगारांना सांगितले. व्यावसायिक गुन्हेगार असल्याने काहीही झाले तरच त्याच्यावर संशय येईल. जो कोणी चूक करताना आढळून येईल त्याला कायद्यानुसार दयामाया दाखवली जाणार नाही. पोलिसांची कारवाई टाळायची असेल तर गुन्हेगारीपासून दूर राहा, असे पोलीस आयुक्तांनी बजावले. यावेळी पोलिस आयुक्तांनी गुन्हेगारांना त्यांच्या कामाबद्दल आणि गुन्ह्यांबाबत विचारणा केली. शहरात गुंडगिरीला थारा नाही. ते जर जबाबदार नागरिकाचे जीवन जगत असतील तर पोलीस त्यांना नाहक त्रास देणार नाहीत.
२००८ पासूनच्या गुन्हेगारांची परेड
२००८ पासून आतापर्यंत अॐेक गुन्हेगार परेडमध्ये दिसून आले. यामध्ये खुनाच्या गुन्ह्यातील गुन्हेगारांची संख्या सर्वाधिक होती. मकोका, एमपीडीए, तडीपारीच्या कारवाईला सामोरे जाणाऱ्या गुन्हेगारांनाही कडक इशारा देण्यात आला.
गुन्हेगारांची कुंडली तयार
परेडसाठी आलेल्या ३१७ गुन्हेगारांची डाटा बँक तयार करण्यात आली आहे. यामध्ये त्याचे छायाचित्र, वैयक्तिक आणि गुन्ह्यांची माहिती नोंदवण्यात आली आहे. इतर गुन्हेगारांसाठीही अशी डाटा बँक तयार करण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले.
सावकारांचीही चौकशी केली जाईल
पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांनी सांगितले की, पोलीस सावकारांविरोधातही मोहीम राबवणार आहेत. सावकार कर्ज देण्याच्या नावाखाली गरजूंचे रक्त शोषून काम करतात. परवान्याच्या नावाखाली अनेक सावकार हा व्यवसाय करतात. शहरात किती परवानाधारक सावकार आहेत, याची कल्पना नाही. सावकारी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची पोलिस चौकशी करतील.