खडकाळ जमिनीवर फुलविले नंदनवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:07 AM2021-04-06T04:07:13+5:302021-04-06T04:07:13+5:30
विजय नागपूरे कळमेश्वर : ‘डार्क झोन’मध्ये असलेल्या परिसरात शेती करणे म्हणजे दिवा स्वप्नच! मात्र कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा येथील ...
विजय नागपूरे
कळमेश्वर : ‘डार्क झोन’मध्ये असलेल्या परिसरात शेती करणे म्हणजे दिवा स्वप्नच! मात्र कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा येथील नीळकंठ उर्फ बाबा कोढे यांनी खडकाळ जमिनीत २२ एकरात संत्रा आणि मोसंबीची बाग फुलविली. यात आंतरपीक म्हणून दहा क्विंटलच्या जवळपास अद्रकाची लागवड केली. या सर्व पिकांचे ओलीत करण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करीत पाण्याचे योग्य नियोजन केले. त्यांच्या कार्याची दखल घेत राज्य सरकारच्या वतीने २०१८ या वर्षासाठी उद्यान पंडित पुरस्कार जाहीर करण्यात आला. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने कोढे यांच्या कार्याचा घेतलेला आढावा.
कोढे यांनी प्रयत्नांची पराकाष्टा करीत टेकडीवजा चढ-उताराच्या जमिनीचे सपाटीकरण करून चांगल्या दर्जाचे संत्रा उत्पादन घेतले आहे. २००२ त्यांनी मौजा तेलकामठी परिसरात जिरोला (रिठी) येथे २२ एकर डोंगराळ जमीन विकत घेतली. तिचे सपाटीकरण केले. परंतु हा परिसर ‘डार्क झोन’ मध्ये असून येथील भूगर्भात ८०० फूट खोलपर्यंत काळा दगड आहे. यामुळे शेतीचा विकास करायचा कसा, असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. यातून मार्ग शोधत त्यांनी तेलकामठी शिवारातील केसरनाला तलावातून शेतातील विहिरीत व शेततळ्यात पाणी आणले.
अशी केली शेती
- २२ एकर जमिनीपैकी १२ एकरात १५०० संत्रा झाडे, एक हेक्टरमध्ये ५६० मोसंबी झाडे लावली. यात आंतरपीक म्हणून दहा क्विंटलच्या जवळपास अद्रकाची लागवड केली.
- या सर्व पिकांचे ओलीत करण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करीत पाण्याचे योग्य नियोजन केले.
-संत्रा झाडांच्या दोन्ही बाजूस तीन-तीन फूट अंतरावर ठिंबक द्वारे पाणी देण्यात येत असल्याने एकाही संत्रा झाडाला डिंक्यासारखा रोग झाला नसल्याचे कोढे यांनी सांगितले.
सीताफळ, करवंद आणि मुंगन्याची झाडे
शेतात सभोवताली धुऱ्यावर १५० सीताफळ, ६०० करवंद, ६० मुंगन्याची झाडे कोढे लावली. त्यासोबतच शेतात केशर जातीची २० आंब्याची झाडे लावली. यापासून \सुद्धा मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळत असून शेतीसोबतच धुऱ्यावसुद्धा आपण उत्पादन घेऊ शकतो हे सिद्ध करून दाखविले.
दुष्काळात विक्रमी उत्पन्न
२०१८-१९ मध्ये कळमेश्वर तालुक्यात दुष्काळ घोषित करण्यात आला होता. परंतु कोढे यांनी १५०० संत्रा झाडांपासून ११५ टन संत्रा विकून २० लाखाचे उत्पादन घेतले.
-
शेतमालाच्या उत्पादन वाढीबरोबरच गुणवत्तापूर्ण उत्पादन घेणे फार मोठी बाब आहे. त्यासाठी सखोल अभ्यासाची गरज असते. त्या दृष्टिकोनातून नेहमी कृषी विद्यापीठ व कृषी प्रतिष्ठान शिबिरे, कृषी महोत्सवाला वारंवार भेटी देत असतो. त्यामुळे मला जास्तीत जास्त फायदा कसा मिळेल या हेतूने मी अवलोकन करून शेतामध्ये गुणवत्तापूर्ण उत्पादन घेत असतो.
- नीळकंठ कोढे, शेतकरी