जीर्ण क्वाॅर्टरची पॅराफिट काेसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:09 AM2020-12-24T04:09:03+5:302020-12-24T04:09:03+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क खापरखेडा : वलनी वेकोलि वसाहतीतील एका जीर्ण क्वाॅर्टरची पॅराफिट काेसळली. मंगळवारी (दि. २२) रात्री १०.३० वाजताच्या ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
खापरखेडा : वलनी वेकोलि वसाहतीतील एका जीर्ण क्वाॅर्टरची पॅराफिट काेसळली. मंगळवारी (दि. २२) रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडलेल्या घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली. या घटनेमुळे वसाहतीतील रहिवाशांची एकच तारांबळ उडाली. विशेष म्हणजे या वसाहतीतील सर्वच क्वाॅर्टर जीर्ण झाले असून, भिंतीवर जागोजागी भेगा पडल्या आहेत तर अनेक क्वाॅर्टरच्या छताला तडे गेले आहेत.
वलनी वेकोलि वसाहतीत ७०० क्वाॅर्टर आहेत. मात्र बहुतांश कर्मचाऱ्यांचे वसाहतीत वास्तव्य नाही. या क्वाॅर्टरमध्ये बळजबरीने अतिक्रमण करून गेल्या १० वर्षांपासून अनेकांनी आपले वास्तव्य सुरू केले आहे. कडाक्याची थंडी व रात्रीची वेळ असल्याने मोठी दुर्घटना टळली व कुठलीही जीवित झाली नाही. परंतु या घटनेत क्वाॅर्टरची पॅराफिट पडल्याने खालील क्वाॅर्टरच्या साहित्याचे आर्थिक नुकसान झाले.
वलनी कोळसा खाण मागील २२ वर्षांपासून बंद आहे. येथील अनेक कर्मचाऱ्यांना आजूबाजूच्या खाणीत व काहींना बाहेरगावी असलेल्या कोळसा खाणीत समायोजन करण्यात आले. ही वसाहत खूप जुनी असल्याने क्वाॅर्टरची जीर्ण अवस्था झाली आहे. वेकोलि प्रशासनाने वसाहतीत ‘असुरक्षित मकान’ असे फलकसुद्धा लावले आहे. शिवाय, जीर्णावस्थेत असलेली वसाहत खाली करण्यासाठी तशा सूचनाही संबंधितांना प्रशासनाने दिल्या. असे असताना वसाहत मात्र खाली केलेली नाही. या वसाहतीत कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त सेवानिवृत्त कर्मचारी, परप्रांतीय, भाडेकरू वास्तव्यास आहेत. वसाहत खाली करण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मात्र प्रशासनाला अपयश आल्याने अखेर वसाहतीचे मेन्टेनन्स करणेसुद्धा बंद केले आहे.