मेडिकल कॉलेज इस्पितळात पक्षाघाताच्या रुग्णांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 09:54 PM2018-12-03T21:54:07+5:302018-12-03T21:56:17+5:30

वयाच्या साधारणपणे ६० नंतर दिसणाऱ्या पक्षाघाताचे प्रमाण अलीकडे ४० ते ५० वयोगटांमध्येही दिसून येत आहे. हा आजार अपंगत्व व मृत्यूचे चवथे मोठे कारण आहे. सध्या थंडीवाढताच मेडिकलमध्ये या आजाराच्या रुग्णांत वाढ झाली आहे. रोज सकाळच्यावेळेत दोन-तीन रुग्ण येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Paralysis patients increase in medical college hospital | मेडिकल कॉलेज इस्पितळात पक्षाघाताच्या रुग्णांत वाढ

मेडिकल कॉलेज इस्पितळात पक्षाघाताच्या रुग्णांत वाढ

Next
ठळक मुद्देसकाळच्या वेळेत रुग्ण वाढले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वयाच्या साधारणपणे ६० नंतर दिसणाऱ्या पक्षाघाताचे प्रमाण अलीकडे ४० ते ५० वयोगटांमध्येही दिसून येत आहे. हा आजार अपंगत्व व मृत्यूचे चवथे मोठे कारण आहे. सध्या थंडीवाढताच मेडिकलमध्ये या आजाराच्या रुग्णांत वाढ झाली आहे. रोज सकाळच्यावेळेत दोन-तीन रुग्ण येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
शरीराच्या कोणत्याही अवयवाचे अचानक नियंत्रण जाणे याला पक्षाघात, ‘पॅरालिसीस’, लकवा किंवा ‘स्ट्रोक’ असे म्हणतात. मेंदूतील किंवा मज्जातंतूमधील पेशींनी अचानक काम करणे बंद केल्यामुळे ‘पॅरालिसीस’ होतो. त्यामुळे शरीराच्या काही विशिष्ट अवयवांवर नियंत्रण ठेवता येत नाही. स्वत:च्या इच्छेप्रमाणे हात किंवा पाय हलवता येत नाही. या आजाराबद्दल बहुसंख्य लोकांना अजूनही पुरेशी माहिती नाही. त्यामुळे अनेकांना योग्य वेळेत उपचार मिळत नाहीत. परिणामी, जन्मभर अपंगत्व किंवा रुग्ण मृत्यूलाही सामोर जातो. तोंड वाकडे होणे, पायांमध्ये कमजोरी येणे, तोल जाणे, चालताना त्रास होणे, बोलण्यात फरक पडणे, अंधुक दिसणे ही पक्षाघाताची लक्षणे आहेत. ही लक्षणे दिसताच तत्काळ उपचार घेतल्यास मृत्यू व अपंगत्व टाळता येते. आनुवंशिकता, उच्चरक्तदाब, कोलेस्ट्रॉल, हृदय विकार, हृदयाचे अनियमित ठोके, हृदयविकाराचा सौम्य झटका किंवा हृदयघात, मधुमेह, लठ्ठपणा, झोपेदरम्यान अनियमित श्वासोच्छवास, ३५ वर्षाखालील धूम्रपान करणाऱ्या महिलांद्वारे गर्भनिरोधक गोळ्यांचे अतिसेवन, कामाचा ताण व कामाचे अनियमित स्वरूप, स्पर्धात्मक वातावरण, पुरेशा झोपेचा अभाव, पॅकेटमधील खाद्य पदार्थांचा वाढता वापर आदी कारणांमुळे पक्षाघात होतो. सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) पक्षाघाताचे रुग्ण वाढल्याचे औषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. वाय. व्ही. बन्सोड यांचे म्हणणे आहे. त्यांच्यामते, नोव्हेंबर ते जानेवारी या महिन्यांत थंडी पडते. आपले रक्त काही प्रमाणात जाड होते. याला इतरही घटक कारणीभूत ठरतात. परिणामी, पक्षाघात येतो. सध्या मेडिकलमध्ये रोज दोन-तीन रुग्ण उपचारासाठी येत आहेत. यात सकाळच्यावेळेत येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे, असेही ते म्हणाले.
गोल्डन अवरमध्ये उपचार आवश्यक
पक्षाघाताची लक्षणे दिसताच उपचार मिळाल्यास या आजराचे घातक परिणाम कमी करता येतात. यामुळे रुग्णाला ‘गोल्डन अव्हर’मध्ये उपचार मिळणे आवश्यक आहे. परंतु चोर पावलांनी येणारा हा आजार रात्री झोपत आल्यास सकाळी रुग्णालयात पोहचेपर्यंत बराच उशीर होतो. परिणामी, सतर्क असणे आवश्यक आहे.
डॉ. वाय. व्ही. बन्सोड
विभाग प्रमुख, औषधवैद्यक शास्त्र विभाग, मेडिकल

Web Title: Paralysis patients increase in medical college hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.