परमबीर सिंग हे भाजपचे एजंट; राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
By कमलेश वानखेडे | Published: May 15, 2023 04:47 PM2023-05-15T16:47:20+5:302023-05-15T16:47:51+5:30
Nagpur News मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे भाजपचे एजंट असल्याचे सिद्ध झाले असून देशमुख यांना फसविण्यासाठीच त्यांचा वापर करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील यांनी सोमवारी केला.
कमलेश वानखेडे
नागपूर : राज्य सरकारने कॅटच्या निर्णयाचा आधार घेत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे निलंबन परत घेतले. परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांवरून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना १४ महिने तुरुंगात रहावे लागले होते. आता राज्य सरकारने कॅटने वारंवार मागणी करून सिंग यांच्याबाबतचा अहवाल न दिल्याने कॅटने एकतर्फी आदेश दिला. यावरून सिंग हे भाजपचे एजंट असल्याचे सिद्ध झाले असून देशमुख यांना फसविण्यासाठीच त्यांचा वापर करण्यात आल्याचे सिद्ध झाले आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील यांनी सोमवारी केला.
कुंटे पाटील म्हणाले, सिंग यांच्या विरोधात राज्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात आठ ते दहा गुन्हे दाखल आहेत. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिलेटीन ठेवण्याच्या प्रकरणाचा सूत्रधारही सिंग हेच आहेत. एनआयने न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रातही सिंग यांचा या प्रकरणात मुख्य रोल होता, असे नमूद केले आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करून सिंग हे फरार झाले होते. न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाने विचारणा करूनही त्यांनी कुठलेही पुरावे सादर केले नाहीत. आपण ऐकीव माहितीच्या आधारे आरोप केले, असे शपथपत्र शेवटी सादर केले. यावरून देशमुख यांना फसविण्यासाठी मोठी राजकीय शक्ती सिंग यांचा वापर करत होती, हे आता सरकारने कॅटमध्ये सिंग यांच्याबाबतचा अहवाल सादर न केल्याने स्पष्ट झाले आहे, असा आरोप कुंटे पाटील यांनी केला. पत्रकार परिषदेला माजी आ. दीनानाथ पडोळे, वेदप्रकाश आर्य, आभा पांडे, बजरंगसिंग परिहार, श्रीकांत शिवणकर, वर्षा शामकुळे आदी उपस्थित होते.
आवाज दाबण्यासाठी जयंत पाटील यांना नोटीस
- राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील हे सातत्याने भाजपच्या विरोेधात बोलत आहेत. त्यामुळे त्यांचा आवाज दाबण्यासाठी त्यांना ईडीची
नोटीस बजावण्यात आली. या हुकुमशाही प्रवृत्तीपुढे न चुकता राष्ट्रवादी संघर्ष करेल, असा इशाराही कुंटे पाटील यांनी दिला.