परमवीर सिंह हे फडणवीस यांच्या हातचे बाहुले; नाना पटोले यांचा आरोप

By कमलेश वानखेडे | Published: May 16, 2023 05:52 PM2023-05-16T17:52:10+5:302023-05-16T17:52:31+5:30

Nagpur News राज्याच्या इतिहासात एखादा अधिकारी स्वत:च्या मंत्र्यावर १०० कोटींचा आरोप करतो व त्यातून राज्याची बदनामी होते, असा सत्तेसाठी काळिमा लावण्याचा प्रयत्न भाजप सरकारकडून झाला, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

Paramveer Singh is Fadnavis' hand puppet; Allegation of Nana Patole | परमवीर सिंह हे फडणवीस यांच्या हातचे बाहुले; नाना पटोले यांचा आरोप

परमवीर सिंह हे फडणवीस यांच्या हातचे बाहुले; नाना पटोले यांचा आरोप

googlenewsNext

कमलेश वानखेडे

नागपूर : महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी मुंबईचे तत्कालिन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा प्यादा म्हणून वापर केला. आता त्याच प्यादाला कॅटच्या माध्यमातून बाहेर काढण्यात आले. राज्याच्या इतिहासात एखादा अधिकारी स्वत:च्या मंत्र्यावर १०० कोटींचा आरोप करतो व त्यातून राज्याची बदनामी होते, असा सत्तेसाठी काळिमा लावण्याचा प्रयत्न भाजप सरकारकडून झाला, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. राज्याच्या गृहमंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण द्यावे. आम्ही विधानसभेत त्यांना जाब विचारू. नाहीतर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

पटोले नागपुरात म्हणाले, अँटिलिया स्फोटकाचा कट रचून तसेच महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर १०० कोटींच्या वसुलीचे खोटे आरोप करून महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र आता उघडे पडले असून परमवीर सिंह हे फडणवीसांच्या हातचे बाहुले होते हे स्पष्ट झाले आहे. परमवीर सिंहानी केलेल्या मदतीची परतफेड म्हणून शिंदे फडणवीस सरकारने कायदेशीर प्रक्रियेचे पालन न करता निलंबन रद्द करून पुन्हा सेवेत येण्यासाठी त्यांना मदत केली आहे. फडणवीसांनी परमवीर सिंहाच्या हातून महाराष्ट्राची बदनामी केली. कॅटच्या ऑर्डरमध्ये असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की सन्माननीय मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला स्पष्ट आदेश दिले होते की आपण चौकशी करून आरोपपत्र दाखल करा तसेच परमवीर सिंह यांची विभागीय चौकशी करा. पण शिंदे फडणवीस सरकारने ते केले नाही. परमवीर सिंह यांना निलंबित केले होते पण त्यांच्या निलंबनाचा दर तीन महिन्याला आढावा घेऊन निलंबनाला मुदतवाढ देणे आवश्यक होते. मात्र शिंदे फडणवीस सरकारने ना परमवीर सिंहाची विभागीय चौकशी केली ना त्यांच्या निलंबनाला मुदतवाढ दिली. त्यामुळे कॅट न्यायाधिकरणासमोर झालेल्य़ा सुनावनीत राज्य सरकारच्या भूमिकेमुळे परमवीरसिंहांना दिलासा मिळाला.

फडणवीसांवर थेट आरोप

अंबानीच्या घरासमोर घडलेल्या नाट्यातील खऱ्या गोष्टी समोर आल्या पाहिजे. अँटिलीया जवळ स्फोटकांनी भरलेली गाडी पार्क करणे, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचे आरोप करणे हे सर्व प्रकार महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी ठरवून केले होते. फडणवीस विधानसभेत जी स्क्रीप्ट वाचत होते ती ठरवून केली आहे का, असे मत आपण विधानसभेतहीमांडले होते व ते आता स्पष्ट झाले आहे, असा थेट आरोपही पटोले यांनी केला.


लोकसभा अध्यक्षांकडेही सिंह यांच्या भ्रष्टाचाराची फाईल होती
- आपण विधानसभा अध्यक्ष असताना दिल्ली येथे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना भेटलो. त्यावेळी त्यांनी परमवीर सिंह यांच्या भ्रष्टाचाराबाबतची फाईल आपल्याकडे काही जणांनी दिल्याचे त्यांनी सांगितले होते. त्या फाईलची एक प्रतिलीपी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनाही संबंधिताने दिल्याचे ते म्हटले होते. यानंतर परमवीरसिंह मला भेटायला आले होते. त्यावेळी याबाबत मी स्वतः त्यांना विचारले असता त्यांनी आमच्या खात्यात असे चालते असे उत्तर दिले होते. यावरून हे स्पष्ट होते की परमवीर सिंहाच्या भ्रष्टाचाराची संपूर्ण माहिती पंतप्रधान कार्यालय, मुख्यमंत्री आणि लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयाला असूनही त्याच्यावर कारवाई होणे दूरच त्याची साधी चौकशीही भाजप सरकारने केली नाही, असेही पटोले म्हणाले.

Web Title: Paramveer Singh is Fadnavis' hand puppet; Allegation of Nana Patole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.