चक्क ट्रान्सपोर्टमधून पाठविले जात होते गांजाचे पार्सल
By योगेश पांडे | Updated: October 18, 2024 20:24 IST2024-10-18T20:23:41+5:302024-10-18T20:24:03+5:30
तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

चक्क ट्रान्सपोर्टमधून पाठविले जात होते गांजाचे पार्सल
योगेश पांडे - नागपूर, लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीत कुरिअरच्या माध्यमातून ड्रग्जच्या तस्करीची प्रकरणे समोर आली होती. आता ट्रान्सपोर्ट कंपनीच्या माध्यमातून गांजाचे पार्सल पाठविण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.
गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. गीतांजली चौक, सेंट्रल एव्हेन्यू येथील पुजा ट्रान्सपोर्टच्या कार्यालयातून एक व्यक्ती गांजाचे पार्सल पाठवत असल्याची माहिती खबऱ्यांच्या माध्यमातून पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तेथे जात कंपनीतील पार्सलची झडती घेतली. एका पार्सलमध्ये तीन प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये अडीच किलोहून अधिक वजनाचा गांजा आढळला. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता ऑटोचालकांचे खाकी रंगाचे कपडे घालून एका व्यक्तीने ते पार्सल आणल्याचे दिसून आले. खबऱ्यांच्या माध्यमातून पोलिसांनी संबंधित इसमाचा शोध लावला व अब्दुल आसीफ उर्फ गनी शेख (४८, आझमशहा चौक) याला ताब्यात घेण्यात आले. आरोपी कुणाला गांजा पाठवत होता, किती दिवसांपासून हा प्रकार सुरू होता याची चौकशी सुरू आहे. त्याच्याविरोधात तहसील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.