राज्यातील बसस्थानकांवर होणार ‘पार्सल स्टोअर रूम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 10:35 AM2020-07-30T10:35:01+5:302020-07-30T10:38:09+5:30
लहान व्यापारी, नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन एसटी महामंडळाने किरकोळ वाहतूक सुरू करण्याचा विचार सुरू केला असून त्यासाठी लवकरच राज्यभरातील बसस्थानकांवर ‘पार्सल स्टोअर रूम’ साकारणार आहेत.
दयानंद पाईकराव
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे एसटीच्या बसेस ठप्प झाल्या आहेत. यात महामंडळाने उत्पन्नाचे साधन म्हणून एसटीच्या बसेस ट्रकमध्ये रूपांतरित करून माल वाहतुकीला सुरुवात केली आहे. परंतु सर्वांनाच एसटीचा ट्रक बुक करणे शक्य नसते. एक किंवा दोन टन माल असल्यास त्यांची पंचाईत होते. लहान व्यापारी, नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन एसटी महामंडळाने किरकोळ वाहतूक सुरू करण्याचा विचार सुरू केला असून त्यासाठी लवकरच राज्यभरातील बसस्थानकांवर ‘पार्सल स्टोअर रूम’ साकारणार आहेत.
एसटी महामंडळाचे उत्पन्न कोरोनाच्या संकटामुळे ठप्प झाले आहे. यातून सावरण्यासाठी एसटीच्या अधिकाऱ्यांनी शक्कल लावून माल वाहतुकीचा पर्याय शोधून काढला आहे. खासगी वाहतूकदारांच्या तुलनेत एसटीच्या माल वाहतुकीचे दर परवडणारे असल्यामुळे एसटीच्या माल वाहतुकीला चांगला प्रतिसादही मिळत आहे. परंतु प्रत्येकाला संपूर्ण ट्रक बुक करणे शक्य नसते. अनेकांना एक, दोन किंवा तीन टन माल पाठवावा लागतो. त्यामुळे पूर्ण ट्रक बुक करणे त्यांना परवडत नाही. त्यावर पर्याय शोधून एसटीच्या अधिकाऱ्यांनी ‘पार्ट लोड’ म्हणजे किरकोळ वाहतूक सुरू करण्याची तयारी केली आहे. त्यासाठी एसटीचे अधिकारी, कर्मचारी बाजारात फिरून दररोज कोणते व्यापारी माल पाठवितात, याची चाचपणी सुरू आहे. त्यानंतर या व्यापाऱ्यांचा माल बसस्थानकांवर ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यभरातील बसस्थानकांवर ‘पार्सल स्टोअर रूम’ तयार करण्यात येणार आहेत. व्यापाऱ्यांचा किरकोळ माल या पार्सल स्टोअर रूममध्ये ठेवून तो संबंधित ठिकाणी रवाना करण्यात येईल. तसेच इतर ठिकाणांवरून आलेला मालही स्थानिक व्यापारी या पार्सल स्टोअर रूममधून नेऊ शकणार आहेत. किरकोळ वाहतूक सुरू केल्यानंतर एसटीच्या माल वाहतुकीला राज्यभरात अजून प्रतिसाद मिळून एसटीचे उत्पन्न वाढणार असल्याचा दावा एसटीच्या अधिकाºयांनी केला आहे.
लवकरच साकारणार ‘पार्सल स्टोअर रूम’
‘एसटीच्या माल वाहतुकीला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु लहान व्यापाऱ्यांसाठी एसटीने किरकोळ वाहतूक सुरू करण्याचा विचार केला आहे. त्यासाठी राज्यातील बाजारपेठात चाचपणी सुरू आहे. या व्यापाऱ्यांचा माल ठेवण्यासाठी एसटीच्या राज्यभरातील बसस्थानकांवर लवकरच पार्सल स्टोअर रूम साकारण्यात येतील.’
-वैभव वाकोडे, यंत्र अभियंता, मुंबई
ट्रकची संख्या वाढविणार
‘एसटी महामंडळाच्या माल वाहतुकीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ट्रकची संख्या कमी पडत आहे. लवकरच आणखी एसटी बसेसचे ट्रकमध्ये रूपांतर करून किरकोळ माल वाहतुकीला सुरुवात करण्यात येणार आहे.’
-शिवाजी जगताप, उपमहाव्यवस्थापक, नियंत्रण समिती ३, मुंबई