पारडी, भंडारा रोड ते प्रजापती चौक जड वाहनांसाठी बंद होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:11 AM2021-09-10T04:11:50+5:302021-09-10T04:11:50+5:30
नागपूर : पारडी उड्डाणपूल व मेट्रोच्या कामामुळे एच.बी.टाऊन चौक व प्रजापतीनगर चौक तसेच भंडारा रोडवर वाहतूक नियंत्रित करणे कठीण ...
नागपूर : पारडी उड्डाणपूल व मेट्रोच्या कामामुळे एच.बी.टाऊन चौक व प्रजापतीनगर चौक तसेच भंडारा रोडवर वाहतूक नियंत्रित करणे कठीण झाले आहे. जड वाहनांसाठी हा मार्ग बंद ठेवण्यात यावा, असे आदेश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले असल्याची माहिती आ. कृष्णा खोपडे यांनी दिली. खोपडे यांनी वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टीने महामेट्रो, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, पोलीस आयुक्त यांच्या उपस्थितीत बैठक घेतली.
पारडी उड्डाणपूल व मेट्रो रेल्वेचे काम भंडारा रोड येथे सुरू असून, कंत्राटदाराच्या गलथान कारभारामुळे पारडी पुलाचे काम संथगतीने सुरू होते. त्यामुळे या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी यासंदर्भात अनेकदा नाराजी जाहीर केली व कडक शब्दात अधिकारी व कंत्राटदारांना दम दिल्यामुळे, या भागातील सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र तरीसुद्धा एच.बी.टाऊन चौक, प्रजापतीनगर चौक, पारडी जुना पूल व बाजार चौक या भागात वाहतुकीची मोठी वर्दळ पाहायला मिळत होती. वाहतुकीमुळे होत असलेल्या या गर्दीमुळे या भागात केव्हाही दुर्घटना होण्याची शक्यता होती. ही बाब लक्षात घेऊन हस्तक्षेप करावा लागला व संबंधित बैठक बोलविण्यात आली, असे खोपडे यांनी सांगितले. हे काम आता २४ तास सुरू ठेवून कामाला गती देण्याची सूचना अधिकाऱ्यांना केल्याचे त्यांनी सांगितले.