पारडी उड्डाणपूलाची साडेसाती संपेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:10 AM2021-08-29T04:10:35+5:302021-08-29T04:10:35+5:30

राजीव सिंह लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पूर्व नागपुरातील नागरिकांना पारडी उड्डाणपुलाच्या नावावर जे स्वप्न दाखविण्यात आले ते सात ...

The Pardi flyover is half over | पारडी उड्डाणपूलाची साडेसाती संपेना

पारडी उड्डाणपूलाची साडेसाती संपेना

Next

राजीव सिंह

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : पूर्व नागपुरातील नागरिकांना पारडी उड्डाणपुलाच्या नावावर जे स्वप्न दाखविण्यात आले ते सात वर्षानंतरही पूर्ण झाले नाही. ज्या उड्डाणपुलाचे काम अडीच ते तीन वर्षात पूर्ण होणार होते, ते आजही केवळ ६० टक्केच पूर्ण झाले आहे. तरीसुद्धा राजकीय नेते नागरिकांना स्वप्न दाखविणे थांबवत नसल्याची स्थिती आहे. डिसेंबर २०२१ मध्ये हे काम पूर्ण होणार आहे अशा वर्षभरापासून फसव्या घोषणा करण्यात येत आहेत. परंतु अपूर्ण कामांमुळे पूर्व नागपूरकर वैतागल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

पारडी उड्डाणपुलाच्या अपूर्ण कामादरम्यान एचबी टाऊन चौकात होत असलेले खोदकाम, रस्त्यावर पसरलेली माती, खड्डे, उखडलेले रस्ते येथून ये-जा करणाऱ्या नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहेत. विकासाच्या नावाखाली नागरिकांना त्रास होत असल्यामुळे ते त्रस्त झाले आहेत. दरम्यान प्रजापतीनगर चौक ते एचबी टाऊन चौकादरम्यान मेट्रो रेल्वेच्या पोर्टल म्हणजे बीम टाकण्याचे काम सुरू आहे. येथे मेट्रोच्या पिल्लरचे काम खूप दिवसांपूर्वी पूर्ण झाले आहे. येथून रात्रीच्या वेळी जाणे म्हणजे जीव धोक्यात घालणे ठरत आहे. एनएचएआयच्या वतीने पावसाळ्यात रस्ते खोदण्यात येत आहेत. हलका पाऊस पडल्यास रस्त्याच्या काठावर असलेले मातीचे ढीग वाहून रस्त्याच्या मधोमध येतात. खड्डे आणि ओबडधाबड रस्त्यांमुळे अपघात होऊ शकतो. ८० फुटांच्या रस्त्याची अवस्था अशी झाली आहे की केवळ २० फुटांचा रस्ताच रहदारीसाठी उरला आहे. एनएचएआयच्या मनमानी कारभाराविरुद्ध स्थानिक नगरसेविका चेतना टांक यांनी अनेकदा तक्रार केली. परंतु त्यावर काहीच कारवाई न झाल्यामुळे त्या नाराज झाल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी एनएचएआयला फटकारले. त्यानंतर काही अधिकारी आले. परंतु परिस्थितीत काहीच बदल झाला नाही. चेतना टांक यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, रस्ते चांगले न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा एनएचएआय आणि मेट्रो रेल्वेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. आंदोलनाशिवाय कोणताच पर्याय उरला नसल्याचे त्यांनी सांगितले.

................

पारडी उड्डाणपुलाची स्थिती

-ऑगस्ट २०१४ मध्ये पारडी उड्डाणपुलाचे भूमिपूजन झाले. परंतु २२ महिन्यानंतर जून २०१६ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. जून २०१९ मध्ये प्रकल्प पूर्ण करण्याची डेडलाईन ठरली. परंतु आजपर्यंत हा प्रकल्प पूर्ण झालेला नाही

-ऑक्टोबर २०२० मध्ये एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी डिसेंबर २०२१ पर्यंत उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईल, असा दावा केला होता. मात्र ज्या पद्धतीने सध्या काम सुरू आहे त्यानुसार डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण होणे कठीण वाटत आहे.

-पारडी उड्डाणपुलाचे ५ आर्म आहेत. यात कळमना, पूर्व वर्धमाननगर, भंडारा रोड, रिंग रोड आणि सेंट्रल एव्हेन्यूला जोडण्यात येणार आहे. काही काळापर्यंत पारडी बाजाराच्या जमिनीच्या मुद्यावरून उड्डाणपुलाचे काम रखडले होते. परंतु आता या कामातील अडथळे दूर झाले आहेत.

मेट्रोने खोदकाम केले नाही

‘प्रजापतीनगर ते एचबी टाऊन दरम्यान मेट्रो रेल्वेने कोणत्याही प्रकारचे खोदकाम केलेले नाही. सध्या पोर्टल म्हणजे बीम टाकण्याचे काम सुरू आहे. मेट्रो सुरक्षेच्या मानकांवर लक्ष ठेवून काम करीत आहे.’

-अखिलेश हळवे, उपमहाव्यवस्थापक, काॅर्पोरेट कम्युनिकेशन्स, महामेट्रो

बैठक घेऊन तोडगा काढू

‘एचबी टाऊन चौकाच्या आजूबाजूला पारडी उड्डाणपुलासोबत मेट्रो रेल्वेचे कामही सुरू आहे. वाहतूक वळविण्यासाठी तसेच रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी ३० ऑगस्टला वाहतूक कार्यालयात बैठक बोलाविण्यात आली आहे. बैठकीत तोडगा काढून रस्त्यांची स्थिती सुधारण्यात येईल.’

-एन. एल. येवतकर, प्रकल्प संचालक, एनएचएआय

...........

Web Title: The Pardi flyover is half over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.