भाच्याने केली मामाची हत्या

By admin | Published: May 8, 2016 03:10 AM2016-05-08T03:10:36+5:302016-05-08T03:10:36+5:30

पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आकोला येथे लग्नाच्या पंगतीमध्ये पाहुण्याचा कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची घटना ...

Parent kills Mama's murder | भाच्याने केली मामाची हत्या

भाच्याने केली मामाची हत्या

Next

आरोपीस पाच दिवसानंतर अटक : आत्यावरील अन्यायामुळे खून केल्याची कबुली
देवलापार : पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आकोला येथे लग्नाच्या पंगतीमध्ये पाहुण्याचा कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची घटना सोमवारी (दि. २) रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. या खुनाचा छडा लावण्यात देवलापार पोलिसांना यश आले. विशेष म्हणजे, ‘त्या’ पाहुण्याचा खून हा त्याच्या साळ्याच्या मुलाने केल्याचे तपासात उघड झाले. पाच दिवसांच्या तपासाअंती पोलिसांनी आरोपीस शुक्रवारी मध्यरात्री ताब्यात घेत अटक केली. या खुनाचा तपास देवलापार पोलिसांसाठी आव्हान ठरला होता.
रामकिसन ठेंगडी किरनाके (४८, रा. वरघाट, ता. रामटेक) असे मृताचे तर, तिलक गंगाधर कोवाचे (२२, रा. आकोला, ता. रामटेक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तिलक हा मृत रामकिसन याच्या तिसऱ्या पत्नीच्या भावाचा मुलगा होय. रामकिसन हा आकोला येथे लग्नाला गेला होता. पंगतीमध्ये पाहुण्यांसोबत जेवण करीत असताना पडद्यामागून अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर कुऱ्हाडीने नऊ वार केले. त्यात त्याचा मृत्यू झाला.
रामकिसनने आकोला येथील कोवाचे परिसरातील शकुंतला हिच्याशी काही वर्षांपूर्वी लग्न केले होते. हा त्याचा तिसरा विवाह होता. शकुंतलाकडे वडिलोपार्जित शेती असून, भाऊ गंगाधर हा त्या संपत्तीचा भागीदार होता. या संपत्तीचा वाटा मिळावा, यासाठी रामकिसन शकुंतलाला त्रास द्यायचा. सततच्या शारीरिक व मानसिक त्रासामुळे शकुंतला अधूनमधून भावाकडे आकोला येथे राहायची. तो आत्याला त्रास देत असल्याने तिलकच्या मनात त्याच्याविषयी राग होता.
रामकिसन आकोल्याला लग्नासाठी येताच तिलकने योजना आखली. त्या दिवशी तिलक मित्रांसोबत दारू प्यायला. रामकिसनही दारू प्यायला होता. तिलक पंगतीमध्ये जेवण करण्यासाठी बसला असता रामकिसन पुन्हा दारू प्यायला गेला होता. तिलक हा त्याच्यावर नजर ठेवून होता. रामकिसन मंडपातील पंगतीमध्ये शेवटी जेवायला बसताच अंधाराचा फायदा घेत पडद्यामागून तिलकने त्याच्यावर कुऱ्हाडीने नऊ वार केले आणि पळून गेला. या घटनेमुळे मंडपात तारांबळ उडताच काही वेळाने तिलक तिथे आला. माहिती मिळताच रामटेक पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. मृत रामकिसन हा मामा असल्याचे तिलकने पोलिसांना सांगितले. शिवाय, त्याने स्वत:चा शर्ट काढून रामकिसनच्या शरीराला बांधला होता. या प्रकरणी देवलापार पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली.
तपासादरम्यान ठोस सुगावा मिळत नसल्याने या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला होता. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनीही या परिसरात कानोसा घेतला होता. शेवटी आरोपीस अटक करण्यात देवलापार पोलिसांना यश आले. ही कामगिरी एसडीपीओ डॉ. दीपक साळुंके यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश गोवेकर, देवलापाररचे ठाणेदार विशाल पाटील, राजेश सनोडिया, संदीप कडू, सचिन टेकाडे, सचिन शर्मा, सलीम शेख, बंडू शेळके, नरेश वरकडे, राहुल रंगारी, राजेंद्र अडामे, भोला मडावी, रवी भलावी, किशोर वानखेडे आदींनी बजावली. (प्रतिनिधी)

तिसऱ्या दिवशी बळावला संशय
या प्रकरणाचा तपास पोलिसांसाठी आव्हान ठरले होते. या संदर्भात कुणीही माहिती देण्यास तयार नसल्याने पोलिसांनी सुरुवातीला रामकिसनच्या पहिल्या बायकोचा भाऊ व त्याच्या मुलांना ताब्यात घेतले. परंतु, काही निष्पन्न झाले नाही. घटनेच्या तिसऱ्या दिवशी काहींनी तिलकविषयी संशय व्यक्त केला.
सभेला हजेरी
तपासात नागरिकांचे सहकार्य मिळावे, यासाठी देवलापारचे ठाणेदार विशाल पाटील यांनी शुक्रवारी रात्री आकोला येथे नागरिकांची सभा बोलावली होती. या सभेला जिल्हा परिषद सदस्य शांता कुमरे, पंचायत समिती सदस्य महेश मडावी, महेश ब्रह्मनोटे उपस्थित होते. तिलक कोवाचे देखील या सभेला हजर होता. विशेष म्हणजे, तो समोर बसला होता. त्याच्या हालचालीवरून पोलिसांचा संशय बळावत गेला.

सर्वांचे सहकार्य लाभले
लग्नसमारंभात खून होणे ही दुर्दैवी घटना आहे. या खुनाच्या संदर्भात गावातील एकही व्यक्ती शब्दही बोलायला तयार नव्हता. त्यामुळे मोठे आव्हान निर्माण झाले. ग्रामस्थांची सभा घेऊन काही निष्पन्न होईल, असे वाटत नव्हते. परंतु, मिळालेली गुप्त माहिती, नागरिकांनी केलेले सहकार्य व आरोपीच्या संशयास्पद हालचाली यामुळे या घटनेच्या तपासात यश आले.
- विशाल पाटील,
ठाणेदार, देवलापार.

Web Title: Parent kills Mama's murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.