मुलाने म्हटले, पप्पा मला तुमच्यासोबत राहायचे नाही; नऊ वर्षीय चिमुकल्याच्या मनोवस्थेवर आघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2022 11:10 AM2022-05-30T11:10:18+5:302022-05-30T12:40:03+5:30
पती-पत्नीमध्ये त्याच्या ताब्याविषयी वाद सुरू आहे.
नागपूर : पती-पत्नीमधील भांडणे केवळ त्यांचे नातेच उद्ध्वस्त करीत नाही, तर त्यांच्या मुलांच्या जीवनावरही दूरगामी वाईट परिणाम करतात. अशाच एका प्रकरणात नऊ वर्षीय चिमुकल्याच्या मनोवस्थेवर आघात होत आहेत. पती-पत्नीमध्ये त्याच्या ताब्याविषयी वाद सुरू आहे. हा वाद उच्च न्यायालयात पोहोचला असता मुलाने पप्पासोबत राहायचे नसल्याचे सांगितले. तो जन्मापासून आईसोबत राहत आहे.
उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये मुलाला प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी रात्रभर वडिलांसाेबत राहू द्यावे, असा आदेश कुटुंब न्यायालयाला दिला होता. त्या आदेशाविरुद्ध आईने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. प्रकरणावरील सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने मुलाची इच्छा जाणून घेतली. त्यावेळी त्याने वडिलांसोबत राहायचे नसल्याचे सांगितले. त्यामुळे उच्च न्यायालयाने कुटुंब न्यायालयाच्या वादग्रस्त आदेशाला अंतरिम स्थगिती दिली, तसेच वडिलांना नोटीस बजावून यावर दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्यास सांगितले.
वडिलांवरील आरोप
वडिलांची जीवनशैली विलासी आहे. ते वन पर्यटनासाठी सतत देशविदेशात फिरत असतात. त्यांना मुलाची चिंता नाही. त्यामुळे ते मुलाच्या शिक्षणाचा खर्च देत नाही. याशिवाय, त्यांनी थकीत खावटीचे सुमारे १३ लाख रुपयेही दिले नाही. अशा व्यक्तीकडे मुलाला राहू दिले जाऊ शकत नाही, असे आईचे म्हणणे आहे. आईच्या वतीने ॲड. प्रकाश नायडू व ॲड. सुरभी नायडू यांनी कामकाज पाहिले.