पालकांनो आधी संस्कारित व्हा !

By admin | Published: November 17, 2014 12:59 AM2014-11-17T00:59:04+5:302014-11-17T00:59:04+5:30

काळाच्या बदलात मुलांमध्येही झपाट्याने बदल होत आहे. आज मुलांना संस्कार शिकविण्याची गरज पडत आहे. कारण पालकच संस्कार विसरले आहेत. घरातून संस्कार हरवले असतील,

Parents Be Prepared Before! | पालकांनो आधी संस्कारित व्हा !

पालकांनो आधी संस्कारित व्हा !

Next

संजय रघटाटे : ‘दोन गोष्टी आईसाठी, दोन गोष्टी बाबांसाठी’ उपक्रम
नागपूर : काळाच्या बदलात मुलांमध्येही झपाट्याने बदल होत आहे. आज मुलांना संस्कार शिकविण्याची गरज पडत आहे. कारण पालकच संस्कार विसरले आहेत. घरातून संस्कार हरवले असतील, तर मुले कशी संस्कारित होणार. त्यामुळे आधी पालकांनी संस्कारित व्हावे तेव्हाच मुले सहज संस्कारित होतील, असे मत प्रसिद्ध वक्ते, आॅक्सफर्ड अ‍ॅकेडमीचे संचालक डॉ. संजय रघटाटे यांनी व्यक्त केले.
बालकदिनानिमित्त लोकमत सखी मंच व लोकमत कॅम्पस क्लबतर्फे ‘दोन गोष्टी आईसाठी, दोन गोष्टी बाबांसाठी’ या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून ते उपस्थित होते. सीताबर्डी येथील माहेश्वरी भवनात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सृजन संस्थेच्या संचालिका आणि प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अनुपमा गडकरी व बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रवीण मिश्रा उपस्थित होते. यावेळी डॉ. रघटाटे यांनी प्रबोधनात्मक मार्गदर्शनाबरोबरच, पालकांना पोटभरून हसविले. ते म्हणाले की, आपण जे करतो, तेच मुले करतात. त्यासाठी पालकांनीच स्वत: चेहऱ्यावर हास्य ठेवावे, दुसऱ्याचा आदर करा, चांगले श्रोते बना, कण्हत कण्हत जगण्यापेक्षा गाणे म्हणत जगा. दृष्टी बदला, सृष्टी नक्कीच बदलेल.
आजच्या काळातील मुलांच्या मानसिकतेसंदर्भात बोलताना डॉ. अनुपमा गडकरी म्हणाल्या की, आज पालकांना मुलांच्या बाबतीत चार चॅलेंजेस भेडसावतात. काळानुसार मुलांच्या बुद्धिमत्तेत प्रचंड वाढ झाली आहे.
मुलांना रागही लवकर येतो. टेक्नॉलॉजीचा परिणाम मोठा आहे. मुलांच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. सामाजिक बदलाच्या स्थित्यंतरामध्ये पालक व बालक एकाच प्लॅटफॉर्मवर आले आहेत. बालकांकडे आज बऱ्यापैकी माहिती आहे. यात काही वाईट आणि चांगलीही माहिती आहे. त्यामुळे पालकांनी भीती न बाळगता त्यांच्या बुद्धिमत्तेचा चांगला उपयोग करून घ्यावा, सामाजिक बदल झाला असला तरी, आईवडिलांप्रती त्यांना आजही जिव्हाळा आहे. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधणे गरजेचे आहे. परिस्थितीनुसार मुलांपुढेही अनेक चॅलेंजेस उभे ठाकले आहेत. त्याला तोंड देण्यासाठी बुद्धिमत्तेची गरज आहे.
मुलांना राग लवकर येतो, ते लवकर निराश होतात, त्यामुळे आजचे पालक काळजीत आहेत. जन्मत: प्रत्येक मुलाला १४ भावना असतात. वयानुसार त्याची जाणीव होते. पूर्वी १६ वर्षापर्यंत भावनांची मुलांना जाणीव व्हायची आता ६ व्या वर्षीच भावना जागृत होतात. मुलांमध्ये झालेले बदल पालकांनी ओळखणे गरजेचे आहे. टेक्नॉलॉजीमुळे मुलांना नव्यानव्या गोष्टी दिसत आहेत. त्याचे परिणाम आणि दुष्परिणामही आहे. टेक्नॉलॉजी नेमकी मुलांना काय शिकवित आहे, याकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
या सर्व आव्हानांवर मात करण्यासाठी पालकांनी बालकांशी संवाद वाढविणे गरजेचे आहे. बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रवीण मिश्रा यांनी मुलांमध्ये वाढत असलेल्या दमा या आजारावर मार्गदर्शन करून उपाय सांगितले कार्यक्रमाला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. कार्यक्रमाचे संचालन लोकमत सखी मंचच्या संयोजिका नेहा जोशी यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: Parents Be Prepared Before!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.