पालकांनाे, या २२ शाळांमध्ये करू नका मुलांची ॲडमिशन; जिल्हा परिषद शिक्षण विभागाने जाहीर केली यादी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2022 08:35 PM2022-06-09T20:35:55+5:302022-06-09T20:36:24+5:30
Nagpur News जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शहरात आणि ग्रामीण भागात अनधिकृतपणे सुरू असलेल्या २२ शाळांची यादी जाहीर केली असून या शाळांमध्ये चुकूनही मुलांचे प्रवेश करू नका, असे आवाहन केले आहे.
नागपूर : २०२२-२३ च्या शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली असून पहिली ते दहावीपर्यंत मुलांच्या प्रवेशासाठी पालकांची धावपळ सुरू झाली आहे. मात्र अनधिकृत शाळांची निवड केल्यास पुढे पाल्यांची फसगत हाेऊ शकते. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शहरात आणि ग्रामीण भागात अनधिकृतपणे सुरू असलेल्या २२ शाळांची यादी जाहीर केली असून या शाळांमध्ये चुकूनही मुलांचे प्रवेश करू नका, असे आवाहन विभागाने केले आहे. प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी राेहिणी कुंभार यांनी याबाबत परिपत्रक काढले आहे.
या शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास शिक्षण विभाग जबाबदार राहणार नाही, असा इशाराच विभागाने दिला आहे. अनधिकृत शाळांमध्ये सर्वाधिक शाळा या हिंगणा तालुक्यातील आहे़ बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १८ नुसार कुठलेही व्यवस्थापन विनापरवानगी शाळा सुरू करू शकत नाही़ अन्यथा त्या कलम १८(५)नुसार कारवाईस पात्र आहे़ अशा विनापरवानगी सुरू असलेल्या शाळांमध्ये काटोल तालुक्यातील सनशाइन इंग्लिश मीडियम स्कूल, पंचवटी, कामठी तालुक्यातील बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल, येरखेडा, त्रिमूर्ती पब्लिक कॉन्व्हेंट बाजारगाव, सिद्धिविनायक स्कूल बुटीबोरी, तथास्तु इंग्लिश स्कूल बेलतरोडी, न्यू प्रेरणा कॉन्व्हेंट टाकळघाट, ब्रिलियंट इंग्लिश स्कूल, भगिरथ पार्क वानाडोंगरी, सार्थक इंग्लिश स्कूल राजीवनगर, एस.के. इंटरनॅशनल स्कूल राजीवनगर, पोलीस पब्लिक स्कूल एसआरपी कॅम्प, एसजीएम पब्लिक कॉन्व्हेंट नीलडोह देवी, दी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल इसासनी, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले कॉन्व्हेंट सिर्सी, उमरेड.
नागपूर शहर हद्दीतील एक्सल इंटरनॅशनल स्कूल कळमना, दी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल दाभा, दी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल इंदोरा, मदर्स किड्स स्कूल बिनाकी, एलिझाबेथ कॉन्व्हेंट सेमिनरी हिल्स, दार-ए-मदिना इंग्लिश स्कूल शांतिनगर, मदरसा दारुलम तजुलवरा गर्ल्स गांधीबाग, मदरसा दारुलम तजुलवरा बॉईज गांधीबाग, न्यू रहेमानिया इंग्लिश प्रायमरी स्कूल मोमीनपुरा यांचा समावेश आहे़
या सर्व शाळांवर दंडात्मक कारवाई सुरू आहे़ संबंधित अनधिकृत शाळा सुरू राहिल्यास व्यवस्थापनास एक लाखांचा दंड व सूचना देऊनही शाळा बंद न केल्यास प्रतिदिवस १० हजारांचा दंड ठोठाविण्यात येणार आहे़ पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश घेऊ नये़ त्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास ही जबाबदारी पालकांची राहील, असेही शिक्षणाधिकारी कुंभार यांनी कळविले आहे.