पालकांनो लॉकडाऊन करा चिप्स, कुरकुरे आणि जंकफूड !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 04:19 PM2020-03-28T16:19:53+5:302020-03-28T16:20:24+5:30
कोरोना विषाणू हा सर्वप्रथम ज्याची रोगप्रतिकारक्षमता अत्यंत कमी असते, त्यालाच बाधतो. त्यामुळे नागरिकांनी स्वत:सह मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी होईल, असे अन्न खाऊ नये व देऊ नये, ही काळजी घेणे गरजेचे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जंकफुड हा वर्तमानातील जिवनशैलीचाच एक भाग झाला आहे. त्यामुळे मोठे माणसे जी अन्न खातात तेच अन्न आपसूकच मुलांना दिले जाते. मात्र, जंकफुडमुळे शरीराची प्रतिकारशक्ती (इम्युन पॉवर) ढासळले. त्यामुळे, कोरोनाच्या संक्रमणकाळात पालकांनी मुलांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
कोरोनाच्या संक्रमणापासून बचावात्मक पवित्रा म्हणून देशभरात ‘लॉकडाऊन’ आहे. दिवसेंदिवस संक्रमणाची संख्या वाढत आहे. अशा काळात घराबाहेर पडणे अत्यंत धोक्याचे आहे. वर्तमानातील जिवनशैलीचाच एक भाग असलेले जंकफुड शरीरासाठी अपाय करणारे आहे. अत्यंत चविष्ट असल्याने मुलेही चिप्स, कुरकुरे, नुडल्स अशांसारखे चायनिज फुड आवडीने खात असतात. विशेष म्हणजे, बाहेर रेस्टेराँ किंवा रस्त्यांवर बनविल्या जाणारे हे चायनिज फुड आता घरोघरीही बनायला लागले आहेत. कोरोना विषाणू हा सर्वप्रथम ज्याची रोगप्रतिकारक्षमता अत्यंत कमी असते, त्यालाच बाधतो. त्यामुळे नागरिकांनी स्वत:सह मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी होईल, असे अन्न खाऊ नये व देऊ नये, ही काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी गृहिणींची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. पाकशास्त्रात तज्ज्ञ असणाऱ्या गृहिणींना व्यंजनाचे नवे प्रकार बनविण्याची ही संधी सापडली आहे. अशा काळात कुटूंबातील प्रत्येक सदस्यांच्या सकस आहाराची जबाबदारी गृहिणींवर येऊन ठेपली आहे. बाहेरील कुठलेही अन्न वा मेनू या काळात टाळणे, हीच गोष्ट सध्या सर्वात मोठी उपाययोजना ठरणार आहे.
ज्युस आणि सातू सर्वोत्तम आहार - हरीभाऊ मस्के
: तसेही घरी बनविलेले व्यंजन हेच मुलांसाठी अत्यंत पौष्टीक आहार असतात. प्राचिन भारतीय परंपरेतील स्वयंपाकघरे, आरोग्यवर्धक आहाराचे सर्वात मोठे केंद्र राहीलेले आहे. घरीच सफरचंद, अंगूर, डाळींब खाणे आणि त्यांचा ज्युस उत्तम ठरतो. गहू, ज्वारी, तांदूळ व चन्याच्या डाळीचे एकत्र मिश्रण तुपाच्या अल्पशा मात्रेत भाजून, ते चक्कीवर किंवा मिक्सरवर पिसावे आणि थोडथोडे मुलांना पाण्यात मिश्रण करून दिले जर हा सर्वोत्तम आहार ठरतो. साखर मिक्स केल्याने ही पेस्ट गोड असते. त्यामुळे मुलांना त्याची गोडीही असल्याचे ज्येष्ठ आहारतज्ज्ञ व आयुर्वेदाचार्य डॉ. हरिभाऊ मस्के यांनी सांगितले.
मुलांची इम्युन सिस्टम स्ट्राँग करणे आपल्या हाती - प्रितेश खतवार
: मुलांची इम्युन सिस्टम स्ट्राँग करण्याची पुर्णत: जबाबदारी गृहिणींचीच असते. त्यामुळे मुलांना बाहेरच्या चटक आहाराची सवय लावू नये. मुगाची उसळ, हिरव्या पालेभाज्या, डाळ, भात, पोळी, फळे याच वस्तू त्यांच्या आहारात समाविष्ट कराव्यात. घरात वेगवेगळी व्यंजने मुलांना वेगवेगळ्या प्रकारे देता येऊ शकतात. तसेच मुलांना कोरोना संक्रमणापासून वाचविण्यासाठी त्यांच्या हातात मोबाई देऊ नये. सतत हात धुण्याची सवय लावण्याचे आवाहन बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रितेश खतवार यांनी केले आहे.
आहारात काय द्यावे
* गहू, तांदूळ, ज्वारी व चन्याची डाळ मिक्स करून त्याचे सातू बनवावे. दुधात एक चमचा टाकून पिण्यास द्यावे तर कधी त्याची साखर व पाणी टाकून बनविलेली पेस्ट द्यावी.
* शिळे अन्न देऊच नये. भाताचे वेगवेगळे प्रकार करावे. तेलाचा उपयोग कमी करावा. कधी गोड भात, कधी दह्याचा भात असे पातळ व्यंजन करावे.
* पोळ्यांमध्येही वेगवेगळे प्रकार करता येऊ शकतात. कधी आयते, कधी गोड पोळ्या तर कधी लसूण, कांदे, टमाटे, बटाट्याचे पातळी पराठे करता येतात.
* या काळात गरम दूध घेणे आणि कोमट पाणी पिणे उत्तम राहील. मुलांना याची सवय लावावी.
* गृहिणींनी कडधान्यांचे वेगवेगळे मेन्यू तयार करून मुलांना द्यावे. फळांचा वापर भरपूर करावा.