मयताच्या आई-वडिलांना आठ लाख रुपये भरपाई द्या; रेल्वे अपघाताचे प्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 10:21 PM2020-04-09T22:21:46+5:302020-04-09T22:22:45+5:30
रेल्वे अपघातामुळे मृत्यू झालेल्या मुलाच्या आई-वडिलांना तीन महिन्यात आठ लाख रुपये भरपाई अदा करण्यात यावी, असा आदेश मुंंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मध्य रेल्वेला दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे अपघातामुळे मृत्यू झालेल्या मुलाच्या आई-वडिलांना तीन महिन्यात आठ लाख रुपये भरपाई अदा करण्यात यावी, असा आदेश मुंंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मध्य रेल्वेला दिला. प्रकरणावर न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
रमेश व लता साळुंके असे वडील व आईचे नाव असून, ते जळगाव जिल्ह्यातील रहिवासी आहेत. मयत मुलाचे नाव गणेश होते. ३१ मार्च २०१४ रोजी तो रेल्वेने जळगाव येथून चाळीसगावला जात होता. त्याच्याकडे या प्रवासाचे वैध तिकीट होते. गर्दी असल्यामुळे तो रेल्वे डब्याच्या दारात उभा होता. दरम्यान, सहप्रवाशाचा धक्का लागल्यामुळे तो धावत्या रेल्वेतून खाली पडून मरण पावला.
त्यानंतर आई-वडिलांनी भरपाईसाठी रेल्वे दावा न्यायाधिकरणात अर्ज दाखल केला होता. न्यायाधिकरणने तो अर्ज फेटाळून लावला. पंचनाम्यामध्ये गणेशकडे वैध रेल्वे तिकीट आढळून आले नाही. त्याचा अपघात घरापासून केवळ एक किलोमीटर अंतरावर झाला. त्यामुळे त्याने आत्महत्या केली असू शकते. करिता, अर्जदारांना भरपाई दिली जाऊ शकत नाही, असे मुद्दे रेल्वेने उपस्थित केले होते.
न्यायाधिकरणच्या निर्णयाविरुद्ध आई-वडिलांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले. उच्च न्यायालयाने विविध कायदेशीर बाबी लक्षात घेता न्यायाधिकरणचा निर्णय रद्द करून वरील आदेश दिला. अपघातानंतर मयताजवळचे रेल्वे तिकीट हरवले जाऊ शकते. तसेच, घराजवळ अपघात होणे हे भरपाई नाकारण्याचे कारण ठरू शकत नाही, असे उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांचा आधार घेऊन सांगितले.