सीबीएसईच्या निकालामुळे पालक नाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:09 AM2021-08-01T04:09:08+5:302021-08-01T04:09:08+5:30
नागपूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) च्या बारावीचा निकाल बघितल्यानंतर पालक व विद्यार्थी नाराज झाले. शनिवारी त्यांनी शाळेत ...
नागपूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) च्या बारावीचा निकाल बघितल्यानंतर पालक व विद्यार्थी नाराज झाले. शनिवारी त्यांनी शाळेत पोहोचून नाराजी व्यक्त केली. सोबतच पुनर्मूल्यांकनाची मागणीही केली. शाळांचे म्हणणे आहे की, सीबीएसईने दिलेल्या मूल्यांकनाच्या फाॅर्म्युल्यानुसार विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे गुण कमी होण्यात आमचा सहभाग नाही.
यावर्षी सीबीएसईने बारावीच्या निकालाचा फॉर्म्युला तयार केला होता. या आधारावर शाळांना विद्यार्थ्यांच्या गुणांचे मूल्यांकन करायचे होते. परंतु, निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये १० ते २५ टक्के घट झाल्याची पालकांची व विद्यार्थ्यांची ओरड आहे. काही विद्यार्थ्यांना इतके कमी गुण मिळाले की, ते आयआयटी, नीट व अन्य इंजिनीअरिंग अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासही पात्र नाही. बहुतांश पालक शाळेत पोहोचत असून, पुनर्मूल्यांकनाची मागणी करीत आहे.
- निकाल अंतिम आहे
लोकमतने यासंदर्भात सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक डॉ. संयम भारद्वाज यांच्याशी संपर्क केला. त्यांनी सांगितले की, गुण कमी मिळाले असले तरी शाळा व शिक्षकांचा त्यात दोष नाही. निकाल विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाच्या आधारावर काढण्यात आले आहे. संपूर्ण देशातून अशा तक्रारी येत आहे. त्यांनी स्पष्ट केले की, पालकांनी व विद्यार्थ्यांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही. कारण, हे निकाल अंतिम नाही. याला अपडेट केले जाईल.