आईबाबा आमच्यासाठी तरी मास्क वापरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:08 AM2021-03-01T04:08:14+5:302021-03-01T04:08:14+5:30

शालेय विद्यार्थ्यांचे पालकांना भावनिक आवाहन नागपूर : आई-बाबा बाहेर जातांना मास्क वापरतात का?, सॅनिटायझर वापरतात का?, बाहेरून आल्यावर हातपाय ...

Parents use masks for us though | आईबाबा आमच्यासाठी तरी मास्क वापरा

आईबाबा आमच्यासाठी तरी मास्क वापरा

googlenewsNext

शालेय विद्यार्थ्यांचे पालकांना भावनिक आवाहन

नागपूर : आई-बाबा बाहेर जातांना मास्क वापरतात का?, सॅनिटायझर वापरतात का?, बाहेरून आल्यावर हातपाय स्वच्छ धुतात का, असे पत्र आरोग्यमंत्र्यांनी शालेय विद्यार्थ्यांना पाठविले आहे. कारण मुलांच्या भावनिक आवाहनाची दखल पालक जास्त प्रमाणिकपणे घेतात. पण शहरातील काही विद्यार्थ्यांकडून त्यांचे पालक खरचं काळजी घेतात का? याचा आढावा घेतला असता विद्यार्थ्यांच्या बोलण्यातून काहीशी नकारात्मकता आढळून आली. पालकांची बदनामी होणार नाही म्हणून विद्यार्थ्यांनी काहीशा सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. पण एकंदरीत परिस्थिती लक्षात घेता, या विद्यार्थ्यांनी आईबाबांना स्वत:साठी आणि आमच्यासाठीही मास्क वापरा असे भावनिक आवाहन देखील केले.

मार्च २०२० पासून राज्यात कोरोनाने पाऊल टाकले आणि विद्यार्थ्यांच्या शाळा बंद झाल्या. वर्षभरापासून मुले घरातच दडलेली आहे. कुठेतरी कोरोना शिथिल झाला तेव्हा मैदानावर, मित्रांसोबत बगिच्यात मुले दिसली. पण पुन्हा कोरोनाने विळखा घातला. शाळकरी मुलांनी कोरोनाचे तांडव अनुभवले. अनेक मुलांच्या घरातील सदस्यांना कोरोनाची लागण झाली. कोरोना किती घातक आहे, याचा अनुभव शाळकरी मुलांना आला. कोरोनापासून बचाव करण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, हे सुद्धा विविध माध्यमातून त्यांच्यावर बिंबविण्यात आले. पहिल्या टप्प्यात कोरोनाने विद्यार्थ्यांना टार्गेट केले नव्हते. दुसऱ्या टप्प्यात मात्र विद्यार्थी कोरोनाला बळी पडू लागले. त्यामुळे मुलांनी कोरोनाचा धसका घेतला. घरातून कामानिमित्त जाणारे आईबाबा यांनी सुरक्षितता बाळगावी अशी अपेक्षा मुलांकडून व्यक्त व्हायला लागली आहे. जे पालक प्रशासनाचे ऐकत नाही, दंडात्मक कारवाई करूनही कोरोनाची जाणिव नाही, अशा पालकांना आरोग्य मंत्र्यांनी मुलांच्या माध्यमातून समजविण्याचा प्रयत्न केला आहे. मुलांच्या निरागस भावनांची साद पालकांनी ऐकावी म्हणून राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी शालेय विद्यार्थ्यांना पत्र पाठवून प्रश्न केले आहे. पालक खरचं काळजी घेतात का? यासंदर्भात लोकमतने विद्यार्थ्यांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

- आईबाबा आमची काळजी घेतातच. लॉकडाऊनच्या काळात आम्ही बाहेर पडणार नाही, याची काळजी त्यांनी घेतली. तेव्हा बाहेर पडताना स्वत:चीही काळजी घेत होते. पण अनलॉक झाल्यानंतर ते काहिसे बिनधास्त झाले. तो बिनधास्तपणा आताही कायम आहे.

गणेश ओलोकर, विद्यार्थी

- अनलॉक झाल्यानंतर जे कौटुंबिक कार्यक्रम सुरू झाले. त्यात सर्व घोळ झाला. नातेवाईकांना वाईट वाटेल म्हणून आईबाबा लग्नकार्यात सहभागी होत होते. कोरोनापासून बचाव करण्यासाठीच्या उपाययोजनाकडे देखील दुर्लक्ष झाले होते. पण आता पुन्हा कोरोनाने तोंड काढल्यामुळे आईबाबांना गर्दीच्या जागी जाण्यासाठी मज्जाव केला आहे.

संस्कृती काळे, विद्यार्थिनी

- सुरुवातीला घराबाहेर पडतानाही आईबाबा मास्क लावायचे. अनलॉकनंतर त्यांचे मास्क ते घरातच विसरायला लागले. सुरुवातीला बाबा सॅनिटायझरची बॉटल खिशात ठेवायचे. आता त्यांनी काळजी घेणे सोडले आहे. बाहेरून आल्यावर हातपाय स्वच्छ धुणे तर दूरच राहिले.

मृणालिनी नेहरे, विद्यार्थिनी

- बाबा अजूनही ऑफिसमधून आल्यावर अंघोळ करतात. सॅनिटायझर व मास्कचा वापर ते सातत्याने करतात. पण भीती वाटते ते गर्दीमध्ये जातात.

श्लोक हटवार, विद्यार्थी

- कोरोनाचे संकट पुन्हा वाढत आहे. आमच्या शाळा बंद आहेत. आता आईबाबा आणि घरातील मोठ्यांनीही कार्यक्रमात, लग्नासाठी जायला नको. जशी आम्हाला बाहेर पडण्याची मनाई आहे. तशी काळजी आईबाबा स्वत:ची घेत नाही.

निहारिका सोनटक्के, विद्यार्थिनी

- कोरोना असल्यामुळे घराबाहेर पडू नका? तोंडाला मास्क लावा, बाहेरून आल्यावर हातपाय स्वच्छ धुवा हा जो आग्रह आई-बाबा आमच्याबाबतीत करतात. ते मात्र स्वत:कडे दुर्लक्ष करतात.

श्रेयस पोळ, विद्यार्थी

- स्वत:ची काळजी घ्या आणि आईबाबाचीही काळजी घ्या !

प्रथम तुम्ही स्वत:ची काळजी घ्या. तसेच आई-वडील, भाऊ-बहिण, शेजाऱ्यांचीही काळजी घ्या. वडीलधाऱ्या मंडळींमध्ये कोरोनाची लक्षणे दिसलीच तर त्यांना तातडीने दवाखान्यात घेऊन जा. त्यांची काळजी घेण्यासाठी आरोग्ययंत्रणा सज्ज आहे. आई-वडिलांना कामानिमित्त बाहेर जावे लागते. बाहेर जाताना ते मास्क लावतात का? बाहेरून आल्यावर हातपाय स्वच्छ धुतले का? सॅनिटायझर वापरले का, हे देखील पाहा, असा सल्ला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपल्या पत्रातून शालेय विद्यार्थ्यांना दिला आहे.

- काळजी घ्या, सुरक्षित रहा

स्वत:ची काळजी नाही तर कुटुंबाची काळजी म्हणून मास्क वापरा, हात वारंवार सॅनिटाईज करा, सोशल डिस्टेंसिंगचे पालन करा. गर्दीत जाणे टाळा. ताप, सर्दी, खोकला असेल तर कोरोनाची टेस्ट करा. कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीपासून मुलांना दूर ठेवा.

डॉ. माधुरी थोरात, उपजिल्हा शल्य चिकित्सक

Web Title: Parents use masks for us though

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.