शाळेची थकीत फी पालकांना भरावीच लागेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 06:04 AM2020-06-06T06:04:12+5:302020-06-06T06:04:22+5:30
गेल्या महिन्यापासून पालकांमध्ये शाळेच्या फी संदर्भात संभ्रमाची स्थिती आहे. फी जमा करण्यासंदर्भात शाळेकडून मिळत असलेल्या संदेशांमुळे पालक संभ्रमात आहेत.
आशिष दुबे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पालकांना कुठल्याही परिस्थितीत शाळेची फी द्यावीच लागणार आहे. फी न घेण्याबाबत राज्य सरकारने कुठलीच सूट दिलेली नाही. शिक्षण विभागाने पालकांना फी भरण्यासाठी सवलत देण्याचे निर्देश शाळांना दिले आहेत यासंदर्भात वेळोवेळी शिक्षण विभागाने दिशानिर्देश जारी केले आहेत. यात कुठेही पालकांना शाळेची फी जमा करू नये, असे सांगितलेले नाही.
गेल्या महिन्यापासून पालकांमध्ये शाळेच्या फी संदर्भात संभ्रमाची स्थिती आहे. फी जमा करण्यासंदर्भात शाळेकडून मिळत असलेल्या संदेशांमुळे पालक संभ्रमात आहेत. शाळेकडून फी ची थकीत रक्कम जमा करण्यास सांगितले जात आहे. नवीन सत्राची फी जमा करण्यासाठी अवधी दिला आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने केंद्रीय माध्यमिक श्क्षिण मंडळ (सीबीएसई) व राज्य शिक्षण मंडळाशी संबंधित विना अनुदानित इंग्रजी माध्यमांचे शाळा संचालक व संस्था संचालकांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी तसेच शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. संस्थाचालकांचे म्हणणे आहे, की राज्याच्या शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार विभागीय शिक्षण उपसंचालकांनी १८ मे रोजी एक पत्र सर्व शाळांना पाठविले. यात सर्वच बोर्डाच्या शाळांना स्पष्टपणे सांगण्यात आले की, पालकांना थकीत फी वसुलीसाठी वेळ देण्यात यावा. पूर्ण फी एकदाच न घेता, काही हप्त्यात देण्याची सुविधा द्यावी. सोबतच नवीन शैक्षणिक सत्रात फीमध्ये कुठलीही वाढ करू नये, असे नमूद केले आहे. त्यानुसार शाळांनी फीमध्ये वाढ केलेली नाही. केवळ पालकांकडून गेल्या सत्रातील थकीत असलेली फी मागितली जात आहे. शिक्षण विभागाच्या अधिकाºयांनीसुद्धा याला दुजोरा दिला आहे.
पालकांवर दबाव टाकण्यात येत नाही
महाराष्ट्र इंग्लिश मीडियम स्कूल ट्रस्टी असोसिएशन (मेस्टा) चे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ टांकसाळे म्हणाले, शाळेकडून पालकांना बळजबरीने फी भरण्याचे संदेश पाठविण्यात येत नाही. थकीत फी आपल्या सुविधेनुसार जमा करण्यास सांगण्यात येत आहे. शिक्षण विभागाच्या गाईडलाईनमध्ये असे कुठेच सांगण्यात आले नाही की पालकांकडून फी घेऊ नका.