नागपूर विमानतळावर पार्किंग शुल्काची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:07 AM2021-05-07T04:07:43+5:302021-05-07T04:07:43+5:30
- मिहान इंडिया लि.तर्फे पार्किंग शुल्कासंदर्भात एएआयच्या नियमांचे उल्लंघन नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालन राज्य शासनाच्या ...
- मिहान इंडिया लि.तर्फे पार्किंग शुल्कासंदर्भात एएआयच्या नियमांचे उल्लंघन
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालन राज्य शासनाच्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) मिहान इंडिया लिमिटेड (एमआयएल) या कंपनीतर्फे करण्यात येते. संचालन करताना ही कंपनी भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एएआय) पार्किंग शुल्काच्या नियम आणि अटींचे सर्रास उल्लंघन करीत असून देशातील अन्य विमानतळाच्या तुलनेत नागपूर विमानतळावर दुचाकी, कार, बस, ट्रक आणि गेटसमोरील परिसरात उभ्या राहणाऱ्या वाहनचालकांकडून पाच ते सहापट पार्किंग शुल्क वसूल करीत आहे. पार्किंगच्या नावाखाली नागपूर विमानतळावर होणारी लूट केव्हा थांबणार, असा प्रवाशांचा सवाल आहे.
पार्किंग शुल्कासंदर्भात आयटीआय कार्यकर्ते संजय थूल यांनी माहिती अधिकारांतर्गत नागपूर विमानतळ आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण संचालित करीत असलेल्या पोर्ट ब्लेअर विमानतळावरील पार्किंग शुल्काचे दर मागविले. याशिवाय त्यांनी चेन्नई आणि कोलकाता विमानतळावरील दराचा तक्ता मागितला. नागपूर विमानतळ आणि पोर्ट ब्लेअरसह चेन्नई व कोलकाता येथील विमानतळावर आकारण्यात येणाऱ्या पार्किंग शुल्कात मोठी तफावत आढळून आली. नागपूर विमानतळावर होणारी पार्किंगची लूट थांबविण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल करणार असल्याचे संजय थूल यांनी सांगितले.
थूल म्हणाले, पोर्ट ब्लेअरवर ३० मिनिटांसाठी कोच (बस/ट्रक) ३० रुपये, टेम्पो, एसयूव्ही, मिनी बस, कारकरिता ३० रुपये, दुचाकीसाठी १० रुपये तसेच ३० पेक्षा जास्त मिनिटांसाठी कोच (बस/ट्रक) ७० रुपये, टेम्पो, एसयूव्ही, मिनी बसकरिता ६० रुपये, कार ५५ आणि दुचाकीसाठी १५ रुपये पार्किंग शुल्क आकारण्यात येते. तसेच चेन्नई व कोलकाता विमानतळावर ३० मिनिटांसाठी कोच, बस, ट्रककरिता ५० रुपये, अन्य वाहनांसाठी ४० रुपये, दुचाकी २० रुपये व ३० पेक्षा जास्त मिनिटांसाठी दुचाकीला २५ रुपये तर अन्य सर्व वाहनचालकांकडून दुप्पट शुल्क घेण्यात येते. पण नागपूर विमानतळ सी श्रेणीत येत असल्याने एएआयच्या नियमानुसार ३० मिनिटांसाठी कोच, बस, ट्रककरिता ३० रुपये, कार २० रुपये आणि दुचाकीकरिता १० रुपये पार्किंग शुल्क अपेक्षित आहे. पण मिहान इंडिया लिमिटेड कंपनी मनमानी करीत असून हवे तेवढे शुल्क आकारून वाहनचालकांची फसवणूक करीत आहेत. निविदा रद्द करून भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या नियमानुसार पार्किंग शुल्काच्या निविदा काढव्यात, अशी मागणी संजय थूल यांनी केली.
ते म्हणाले, मिहान इंडिया लि.च्या एक्झिक्युटिव्ह (कमर्शियल) वेल्लारी दाते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आता पार्किंग शुल्कासंदर्भात काहीही करता येणार नाही, नवीन निविदा निघेपर्यंत वाट पाहा, असे उत्तर दिले. निविदेत कंत्राटदाराला फायदा करून देणाऱ्या नियमांचा समावेश केला आहे. या प्रक्रियेत आर्थिक व्यवहार होण्याची दाट शक्यता असल्याचा आरोप थूल यांनी केला आहे. पार्किंग शुल्काच्या नावाखाली मिहान इंडिया लिमिटेडने वर्ष २०२१ पर्यंत ११.५० कोटी रुपये प्रवाशांकडून कमविले आहेत, हे विशेष.
पाच वर्षांसाठी निविदा
पार्किंग शुल्कासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अटी व नियमांचे पालन करणे वा न करणे, याचे बंधन नाही. एएआय संचालित विमानतळावर पार्किंग शुल्क कमी आहे. पण नागपूर विमानतळ कंपनी संचालित असल्याने पार्किंग शुल्क थोडे जास्त आहे. पाच वर्षांसाठी कंत्राट दिले असून तीन वर्ष पूर्ण झाली आहेत.
आबीद रूही, वरिष्ठ विमानतळ संचालक, मिहान इंडिया लि.