पार्किंग प्लाझा आहे पण, कार उभी ठेवता येत नाही
By admin | Published: September 18, 2016 02:39 AM2016-09-18T02:39:30+5:302016-09-18T02:39:30+5:30
नागपूर सुधार प्रन्यासने कित्येक वर्षानंतर शहरात एकमेव कार पार्किंग प्लाझा सीताबर्डी येथे तयार केला आहे.
सीताबर्डीतील वास्तव : ठेकेदारांची मनमानी, अधिकाऱ्यांचे संरक्षण
नागपूर : नागपूर सुधार प्रन्यासने कित्येक वर्षानंतर शहरात एकमेव कार पार्किंग प्लाझा सीताबर्डी येथे तयार केला आहे. परंतु येथे कार पार्किंगच्या नावावर मनमानी वसुली केली जात आहे. कार पार्किंग प्लाझाला लागून असलेल्या हॉटेलमध्ये येणाऱ्या कारचालकांना सुद्धा प्लाझामध्येच कार पार्क करण्यासंदर्भात प्राथमिकता दिली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
लोकमत चमूने शनिवारी या परिसराची पाहणी केली तेव्हा हा सर्व प्रकार लक्षात आला. लोकमत चमू जेव्हा एनआयटीच्या कार पार्किंग प्लाझासमोर पोहोचली तेव्हा प्लाझासमोर थांबणाऱ्या कारचालकांना तेथील गार्ड हटवित होता. येणाऱ्यांची विचारपूस केली जात होती. या प्लाझाच्या बाजूलाच मल्टीप्लेक्स आणि मॉल आहे. त्यामुळे अनेकजण येथे कारने येतात. मल्टीप्लेक्ससमोर कार पार्कचे शुल्क केवळ २० रुपये आहे. परंतु तिथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप त्रास सोसावा लागतो. प्लाझाचे गार्ड त्याला गाडी नेऊच देत नाहीत.
लोकमत चमूने कार पार्किंग प्लाझासमोर सकाळच्या वेळी उपस्थित असलेल्या एका कर्मचाऱ्याशी संवाद साधला असता त्याने सांगितले की, ही हॉटेलची कार पार्किंग आहे. तुम्ही हॉटेलात आले आहात का. गाडी पार्क करायची असेल तर सांगा. आम्ही त्यांना येथे किती मुले काम करतात अशी विचारणा केली. त्यावर तो कर्मचारी म्हणाला काम काय आहे ते सांगा. कुणाला कामावर ठेवायचे आहे का? त्याला ड्रायव्हिंग यायला हवे आणि १२ तास काम करावे लागेल.
यानंतर दुपारी २ वाजताच्या सुमरास पार्किंग प्लाझाच्या काऊंटरवर हॉटेलचा एक कर्मचारी बसला होता. त्याच्याकडे गेलो तेव्हा त्याने काय काम आहे, अशी विचारणा केली. पार्किंग शुल्काबाबत विचारले असता त्याने सरळ १०० रुपये शुल्क सांगितले. यानंतर तो हॉटेलमध्ये आलेल्या लोकांच्या कार पार्क करण्याच्या कामाला लागला.
येथील पार्किंग प्लाझामध्ये जो काही प्रकार सुरू होता, तो प्रत्यक्ष अनुभवल्यानंतर येथे कंत्राटदाराची मनमानी सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. तसेच याला अधिकाऱ्यांची सुद्धा साथ असल्याची शंका नकारता येत नाही. (प्रतिनिधी)
टेंडर काढणार
सध्या कार पार्किंग प्लाझा प्रायोगिक तत्त्वावर संचालित आहे. याचे टेंडर काढले जाईल. कार पार्किंगचे शुल्क नासुप्रतर्फे निश्चित केले जाईल. याचे नियमितपणे निरीक्षण केले जाते.
-पंकज अंभोकर , अभियंता , नासुप्र
तीन वर्षांपूर्वी बनले पार्किंग प्लाझा
७२ कार होऊ शकतात पार्क
६० पार्किंग स्पॉट नासुप्रला आणि १२ डेव्हलपरला वितरित करण्यात आले आहे.
टेंडर व्हायचे आहे
कार पार्किंग प्लाझा आणि याला लागून असलेली व्यावसायिक प्रतिष्ठाने एकाचवेळी लीजवर देण्यात आली, सध्या ती सुरू आहेत. परंतु कार पार्किंग प्लाझासाठी आतापर्यंत स्वतंत्रपणे टेंडर देण्यात आलेले नाही. नासुप्रचे अधिकारी यासंबंधात स्पष्टपणे काहीही सांगत नाहीत. एका स्थानिक बिल्डरला बीओटी तत्त्वावर याचे कंत्राट देण्यात आले आहे.
बळजबरीने हटविले जाते अतिक्रमण
कार पार्किंग प्लाझा परिसरातील अतिक्रमण बळजबरीने हटविले जाते. परिसरातील हॉटेल संचालकांकडून असाच प्रकार काही दिवसांपूर्वी दिसून आला. येथील रस्त्यांवरील ठेल्यांचे अतिक्रमण हटविण्यासाठी मनपाला सूचित करण्यात आले होते, तरीही त्यांनी स्वत:च अतिक्रमण हटविले. सीताबर्डी पोलीस ठाण्यात पुरीभाजी व चाट विक्रेत्यांनी या प्रकरणी सामानाला नुकसान पोहोचवण्याची तक्रार सुद्धा दाखल केली होती.