तरुण वयातही होऊ शकतो ‘पार्किन्सन’
By admin | Published: April 11, 2017 01:59 AM2017-04-11T01:59:33+5:302017-04-11T01:59:33+5:30
पार्किन्सन (कंपवात) हा मेंदूशी निगडीत दीर्घकालीन चालणारा रोग. यात मेंदूतील न्युरो ट्रान्समिटर ‘डोपेमाईन’ सतत कमी होत जातो.
चंद्रशेखर मेश्राम यांची माहिती : भारतात एक कोटी रुग्ण या रोगाच्या विळख्यात
नागपूर : पार्किन्सन (कंपवात) हा मेंदूशी निगडीत दीर्घकालीन चालणारा रोग. यात मेंदूतील न्युरो ट्रान्समिटर ‘डोपेमाईन’ सतत कमी होत जातो. भारतात सुमारे एक कोटी रुग्ण ‘पार्किन्सन’च्या विळख्यात आहेत. वयाच्या ६० वर्षांनंतर साधारण एक टक्का वयोवृद्धांमध्ये हा रोग दिसून येतो. परंतु हा रोग वयोवृद्धांनाच होतो असे नाही, तरुण वयातही होत असल्याचे प्रसिद्ध मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांचे म्हणणे आहे.
११ एप्रिल हा दिवस जागतिक पार्किन्सन दिवस म्हणून पाळला जातो. त्या पार्श्वभूमीवर ते ‘लोकमत’शी बोलत होते. डॉ. मेश्राम म्हणाले, आपल्या शरीराच्या हालचालीवर नियंत्रण ठेवणारे मेंदूतील द्रव्य निग्रा सेल्समधील ‘डोपेमाईन’ कमी झाल्याने हा रोग होतो. यात सूचना देण्याचे तंत्र पूर्णत: गडबडते. सर्वसाधारणपणे प्रौढ वयातील पुरुषांमध्ये हा आजार दिसून येतो. मात्र अलीकडच्या काळात तरुण वयातही हा आजार दिसून येऊ लागला आहे. याचे प्रमाण फार कमी आहे आणि कारणेही वेगळी आहेत. विशेष म्हणजे, मेंदूत तांबे जमा होणे (व्हिल्केन डिसीज) किंवा मेंदूत ‘मँगनीज’ जमा झाल्यास किंवा मानसिक रोगावरील औषधांच्या दुष्परिणामामुळे किंवा पोटाच्या आजारावरील औषधांच्या दुष्परिणामामुळेही पार्किन्सनची लक्षणे दिसून येतात. परंतु यावर औषधे घेतल्यास हा रोग बरा होतो. पण वयानुसार येणारा ‘पार्किन्सन’ हा बरा होत नाही. हा रोग केवळ सुरुवातीच्या टप्प्यातच नियंत्रित केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे, योग्यपद्धतीने उपचार घेतल्यास या रोगाचे रुग्णसुद्धा चांगले जीवन जगू शकतात. मात्र नेहमीकरिता औषधे घ्यावी लागतात. (प्रतिनिधी)
ही आहेत लक्षणे
शरीरात कंपन सुटणे
सर्वच हालचाली मंदावणे
लिहिण्यात अडचणी येणे
बोलण्यात फरक पडणे
चालताना सुरुवातीला अडचण येणे आणि चालायला लागल्यास धावायला लागल्यासारखे चालणे
चालताना तोल जाणे, हातापायाला कडकपणा आदी या रोगाची लक्षणे दिसून येतात.
औषधे लागत नसल्यावर शस्त्रक्रिया
डॉ. मेश्राम म्हणाले, जे पार्किन्सनचे रुग्ण औषधाने बरे होत नाही, त्यांच्यासाठी ‘डीप ब्रेन स्टिम्युलेशन’ शस्त्रक्रिया फायद्याची ठरते. यात हृदयात जसा पेसमेकर बसविला जातो, तसा पेसमेकर मेंदूत बसविला जातो आणि हातात त्याचे ‘रिमोट’ असते. गरजेनुसार रिमोटच्या मदतीने ‘पॉवर’ वाढविता येतो. जसे चालायचे असेल तसे त्याचा ‘पॉवर’ वाढवायचा आणि झोपायचे असेल तर तो कमी करायचा. मात्र या शस्त्रक्रियेची गरज फार कमी लोकांना पडते. बहुसंख्य रुग्णांमधील हा रोग औषधाने नियंत्रणात असतो.
व्यायाम व औषधे ‘फिफ्टी-फिफ्टी’
पार्किन्सन हा रोग ५० टक्के औषधे व ५० टक्के व्यायामाने नियंत्रणात राहू शकतो. जसे या रोगावरील उपचारामध्ये औषधाचे महत्त्व आहे, तसेच व्यायामाचेही आहे. नियमित व्यायामामुळे शरीरात आलेला कडकपणा कमी होतो. व्यायाम केल्यामुळे मेंदूत चांगल्या ‘रसायन’चे प्रमाण वाढते, असेही डॉ. मेश्राम म्हणाले.