पायऱ्यांवर प्रतिविधानसभा; कर्नाटकविरोधात ठराव, जयंत पाटलांच्या निलंबनाच्या मुद्द्यावर विराेधक आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 05:57 AM2022-12-24T05:57:49+5:302022-12-24T05:58:23+5:30
काळ्या पट्ट्या बांधून आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली.
नागपूर : कर्नाटक सरकार, राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांचे निलंबन व विरोधकांच्या मुस्कटदाबीच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या आमदारांनी शुक्रवारी विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. विधानभवनाच्या पायऱ्यांवर अभिरूप विधानसभा भरवत त्यांनी सरकारविरुद्ध आंदोलन केले. यावेळी काळ्या पट्ट्या बांधून आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली.
सकाळचे विशेष कामकाज आणि नंतरचे नियमित कामकाज या दोन्हींवर बहिष्कार टाकत विरोधकांनी सरकारविरुद्धचा संघर्ष सुरूच ठेवला. सोमवारी जयंत पाटील यांचे निलंबन मागे घेण्यास त्यांच्याकडून दबाव येऊ शकतो. सीमाप्रश्नी सोमवारी ठराव घेण्यास आम्ही सरकारला भाग पाडू, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले.
महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न
महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर कुठलीच कारवाई होत नाही. राज्य सरकारही याबद्दल मौन बाळगून आहे, असा आरोप करीत, सोलापुरातील एका महिलेने विधिमंडळाच्या द्वारावर अंगावर रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी घडली. मात्र, वेळीच हा प्रकार लक्षात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी या तिला ताब्यात घेतले. तिचे नाव कविता चव्हाण आहे. तुम्ही शिवाजी महाराजांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करता, त्यांच्या नावावर राजकारण करता… वारकरी संप्रदायाचा अपमान करता… तुमच्या अधिवेशनात पोलिसांना जेवण मिळत नाही... तुमच्याकडे कुठलेच मुद्दे शिल्लक नाहीत… अशा शब्दांत या महिलेने संताप व्यक्त केला.
उद्धव ठाकरेंची चौकशी करणार
भाजप प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकल्यानंतर अमरावतीतील उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. हे प्रकरण दाबण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिस यंत्रणेवर दबाव आणला होता का, याची चौकशी गुप्तचर विभागाच्या आयुक्तांमार्फत करण्यात येईल, अशी घोषणा गृहविभागाचे प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत केली.
देवेंद्र फडणवीस पुण्याहून थेट दिल्लीला
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून राजकारण पेटले असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेतली.
यावेळी त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याविरोधात पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.
बोम्मई जाणूनबुजून दोन्ही राज्यांतील सौहार्दाचे वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा फडणवीस यांनी यावेळी केला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर सरकारची भूमिका गुपचूप बसून सहन करण्याची आहे. ज्येष्ठ सदस्याचे निलंबन करून त्यांना बोलण्यापासून रोखले जात आहे. लोकशाहीला काळिमा फासणारी ही बाब आहे.
अशोक चव्हाण,
नेते, काँग्रेस
सोमवारी कर्नाटकच्या विरोधात प्रस्ताव मांडण्यात येईल. त्यात राज्य सरकारच्या भूमिकेचा विस्तृत समावेश असणार आहे.
शंभूराज देसाई,
मंत्री व कर्नाटक सीमावाद समन्वय समितीचे सदस्य