पोपटांची विक्री पकडली
By admin | Published: April 17, 2017 02:01 AM2017-04-17T02:01:51+5:302017-04-17T02:01:51+5:30
वन विभागाच्या पथकाने पीपल्स फॉर अॅनिमल संस्थेच्या सदस्यांच्या मदतीने रविवारी सकाळी शहरातील लकडगंज येथील
लकडगंज बाजारात धाड : तिघांना अटक
नागपूर : वन विभागाच्या पथकाने पीपल्स फॉर अॅनिमल संस्थेच्या सदस्यांच्या मदतीने रविवारी सकाळी शहरातील लकडगंज येथील आठवडी बाजारात धाड घालून येथे पोपटांची विक्री करीत असलेल्या तीन आरोपींना अटक केली. शेख आबिद (वय २५) रा. मोमीनपुरा, अंजर अली (वय ३० वर्षे) रा. मोमीनपुरा व आलिम शाह (वय ३७ वर्षे) रा. मोमीनपुरा, अशी आरोपींची नावे आहेत. या कारवाईदरम्यान वन विभागाने आरोपींकडून एकूण १७ पोपट जप्त केले. यात नऊ मोठ्या पोपटांसह आठ लहान पिलांचा समावेश होता. त्यापैकी तीन लहान पिलांचा जागीच मृत्यू झाला होता, तर अन्य काही पिले जखमी झाले होते.
वन विभाग आणि पीपल्स फॉर अॅनिमल संस्थेच्या सदस्यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. या पथकाने आरोपी आणि त्यांच्याकडील पोपटांना ताब्यात घेऊन त्यांना सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास वन विभागाच्या सेमिनरी हिल्स येथील विश्रामगृह येथे आणले. यानंतर येथे घटनेचा रीतसर पंचनामा करण्यात आला. पोपट हा वन्यजीव कायद्याच्या शेड्यूलमध्ये मोडतो. त्यामुळे पोपटांची अशाप्रकारे बाजारात विक्री करणे किंवा त्याला घरातील पिंजऱ्यात बंदिस्त करून ठेवणे गुन्हा ठरतो. नागपूर वन विभागाने तीन वर्षांपूर्वी पोपटांच्या विक्रीविरुद्ध मोहीम उघडून अनेकांना अटक केली होती; शिवाय नागरिकांना आपल्या घरच्या पिंजऱ्यातील पोपटांना जंगलात सोडण्याचे आवाहन केले होते.
त्यानुसार अनेकांनी पोपटांना वन विभागाच्या स्वाधीन केले होते; शिवाय त्यानंतर वन विभागाने ते सर्व पोपट सेमिनरी हिल्स येथील जंगलात सोडले होते. मात्र त्यानंतर वन विभागाची ही मोहीम थंड पडली होती. गत दोन वर्षांत वन विभागातील शिकार प्रतिबंधक पथक आणि भरारी पथकाने एकही कारवाई केलेली नाही. कदाचित त्यामुळेच पोपटांची विक्री करणारे पुन्हा सक्रिय झाले आहेत. ही कारवाई नागपूरचे उपवनसंरक्षक मल्लिकार्जुन यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहायक एल.जी. गेडाम, वनपाल यू.पी. बावणे, वनरक्षक पी.एम. पझारे, वनरक्षक पी.बी. होरे, डी.पी. कोहळे, के.डी. श्रीरंग व शुभम खोरगडे यांच्यासह पीपल फॉर अॅनिमल्स संस्थेचे सदस्य अखिल रोकडे, आशिष गोस्वामी, सुमित जैन, कौस्तुभ गावंडे, आशिष कोरडे, आकाश मथागरे, ओंकार राऊत आणि मंगेश एनोरकर यांनी केली. (प्रतिनिधी)