मेट्रोच्या डबलडेकर पुलाचा भाग कोसळला  : चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2021 09:43 PM2021-06-07T21:43:30+5:302021-06-07T21:44:11+5:30

      लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना लॉकडाऊन काळात नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम वेगाने होत असले, ...

Part of Metro's double-decker bridge collapses: Inquiry order | मेट्रोच्या डबलडेकर पुलाचा भाग कोसळला  : चौकशीचे आदेश

मेट्रोच्या डबलडेकर पुलाचा भाग कोसळला  : चौकशीचे आदेश

Next
ठळक मुद्देअपघातात जीवितहानी टळळी

 

 

 

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना लॉकडाऊन काळात नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम वेगाने होत असले, तरी बांधकामादरम्यान सातत्याने अपघात होत आहेत. सोमवारी दुपारी जवळपास दीड वाजता वर्धा मार्गावरील नवनिर्मित डबलडेकर पुलाचा भाग अचानक रस्त्यावर कोसळला. दुपारची वेळ असल्याने रहदारी कमी होती व त्यामुळे जीवितहानी झाली नाही. ब्लॉकच्या स्वरूपातील हा भाग तुलनेने लहान असला, यामुळे मोठा धोका होऊ शकत होता, तरी या अपघाताच्या चौकशीचे आदेश महामेट्रो प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

काही दिवसांअगोदर अग्रसेन चौकात मॅन हँडलर मशीन कोसळली होती. तेथे कुणीही जखमी झाले नाही. त्यानंतर, नागपूर रेल्वे स्थानकाच्या संत्रा मार्केट दिशेने मेट्रोच्या कामादरम्यान क्रेनच्या खाली येऊन एकाचा मृत्यू झाला होता. त्यात आता या घटनेची भर पडली आहे. एनएचएआय व महामेट्रोतर्फे वर्धा मार्गावर डबलडेकर पूल बनविण्यात आला आहे. याचे कंत्राट नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले होते. या प्रकल्पावर जवळपास पावणेचारशे कोटी रुपये खर्च करण्यात आले. मागील वर्षी याचे लोकार्पण झाले होते. मात्र, सुरू होऊन वर्षही झाले नसताना, मनीषनगरकडे जाणाऱ्या वाय जंक्शनचा एक भाग रस्त्यावर येऊन पडला. पुलाच्या वाय जंक्शनवर एक एक्सपान्शन गॅप आहे. या गॅपला आधार देण्यासाठी तेथे थर्माकोल व काँक्रिटचे मिश्रण भरण्यात आले आहे. या पुलावर असे आणखी काही गॅप आहेत. हे मिश्रण ठोस ब्लॉकमध्ये रूपांतरित झाले आहे. यातील काही ब्लॉक्सला निर्धारित कालावधीनंतर हटविण्यात आले आहे. मात्र, अद्यापही काही ब्लॉक्स कायम आहेत. यातीलच एक भाग अचानक रस्त्यावर पडला.

दोषींवर कारवाई होणार

डबलडेकर पुलाच्या वाय जंक्शनच्या एक्सपान्शन गॅपमध्ये बनविण्यात आलेल्या काँक्रिट-थर्माकोलचा ब्लॉक पडल्यानंतर, या घटनेच्या चौकशीचे आदेश महामेट्रो प्रशासनाने जारी केले आहेत. चौकशीनंतर जो दोषी आढळेल, त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, शिवाय कंत्राटदार कंपनीवरही दंड ठोठावण्यात येईल. पुलावर काँक्रिट-थर्माकोलचे मिश्रण तात्पुरते लावण्यात आले होते. त्याला हटविणे आवश्यक होते, असे प्रतिपादन महामेट्रोचे जनसंपर्क अधिकारी अखिलेश हळवे यांनी केले.

Web Title: Part of Metro's double-decker bridge collapses: Inquiry order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.