नागपुरात मनपा शाळेच्या स्लॅबचा भाग कोसळला; मनपाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थी-शिक्षकांचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2022 05:22 PM2022-07-18T17:22:26+5:302022-07-18T17:31:05+5:30

सुरेंद्रगढ येथे महानगरपालिकेच्या शाळेत स्लॅबचा भाग कोसळण्साची ही दुसरी घटना आहे.

part of the slab of Municipal School collapsed in nagpur; The students and teachers lives are in danger due to negligence of NMC Municipal corporation | नागपुरात मनपा शाळेच्या स्लॅबचा भाग कोसळला; मनपाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थी-शिक्षकांचा जीव धोक्यात

नागपुरात मनपा शाळेच्या स्लॅबचा भाग कोसळला; मनपाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थी-शिक्षकांचा जीव धोक्यात

googlenewsNext

नागपूर : नागपूर महानगर पालिका प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे मनपा शाळांची दुरावस्था होत आहे. पश्चिम नागपुरच्या सुरेंद्रगढ येथील कांचनमाला बोबडे मराठी शाळेच्या इमारतीचा स्लॅबचा भाग कोसळला आहे. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी शाळा सुरु होती मात्र,  सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. महत्वाचे म्हणजे, सुरेंद्रगढ येथे मनपाच्या शाळेत स्लॅबचा भाग कोसळण्साची ही दुसरी घटना आहे.

शाळेची संपूर्ण इमारत मोडकळीस आली असून जागोजागी प्लास्टर गळून पडत आहे. अनेक जागी भिंतीला मोठमोठ्या भेगा पडल्या असून जागोजागी पावसाचे पाणी गळत आहे. शाळेतील वर्ग खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पुरेशी जागा नाही. येथील सहाही वर्गखोल्यांची दुरावस्था झाली आहे. प्रसाधन गृह सुस्थितीत नाही त्याठिकाणी पावसाचे पाणी गळत असल्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांना त्रास सहन करावा लागतोय. दरम्यान, इमारतीच्या पहिल्या माळ्यावर जाण्यासाठी जो जिना आहे त्याठिकाणी ही घटना घडली. जनहित या स्वयंसेवी संस्थेचे संयोजक अभिजीत झा यांनी हा प्रकार उघडकीस आणला.

कांचनमाला शाळेची इमारत गेल्या अनेक वर्षांपासून धोकादायक स्थितीत आहे. अशा परिस्थितीतही वर्षभरापूर्वी बाजूच्या हिंदी माध्यमीक शाळेतील वर्ग याठिकाणी स्थानांतरीत करण्यात आले. पूर्वी या शाळेत फक्त मराठी माध्यमांचे प्राथमिक वर्ग सुरु होते. विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

सुरेंद्रगढ येथे मनपाच्या शाळेत स्लॅबचा भाग कोसळण्साची ही दुसरी घटना आहे. गेल्यावर्षी हिंदी माध्यमिक शाळेत असाच प्रकार घडला होता. नंतर ही इमारत सील करण्यात आली. सुरेंद्रगढ येथील महानगरपालिकेच्या शाळांसाठी सातत्याने संघर्ष करणारे अभिजीत झा यांनी या घटनेसाठी महानगरपालिका प्रशासन व शिक्षण विभागातील अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. शाळेची इमारत धोकादायक असल्याची पूर्ण कल्पना असून देखील मनपा प्रशासनाने विद्यार्थी व शिक्षकांचे जीव धोक्यात घातल्याचे त्यांनी म्हटले आहे. या शाळांचे नव्याने बांधकाम करण्यासाठी महानगरपालिकेने बजेटमध्ये निधीचे नियोजन केले मात्र वर्षभराचा कालावधी लोटला तरी कुठलेही काम सुरु झाले नाही असे झा यांनी म्हटले आहे. शिक्षण विभागातील बेजबाबदार अधिकारी, माजी पदाधिकारी व नगरसेवकांच्या अनास्थेमुळे सुरेंद्रगढ मधील विद्यार्थी आणि शिक्षकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचा आरोप झा यांनी केला आहे.

महानगरपालिकेच्या सुरेंद्रगढ शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी विज्ञान क्षेत्रात जी कामगीरी केली त्यामुळे नागपूर शहराला बहुमान प्राप्त झाला. मात्र गुणवत्ता सिद्ध करुनही या शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांच्या नशिबी मोडकळीस आलेल्या शाळेची इमारत येणे हे दुर्देव असल्याचे ते म्हणालेत. सुरेंद्रगढ व गिट्टीखदान परिसरात मेहनत मजदूरी करणारी तळ हातावर पोट असलेली अनेक कुटुंब राहतात. महानगरपालिकेच्या या दोन्ही शाळा येथील शेकडो कुटुंबांसाठी आधार आहेत. शाळेच्या दुरावस्थेमुळे व शिक्षणासाठी पोषक वातावरण नसल्यामुळे येथील अनेक विद्यार्थ्यांनी टीसी काढून दुसर्‍या शाळेत प्रवेश घेणे सुरु केल्याचे झा यांनी म्हटले आहे. जोपर्यंत या दोन्ही शाळांचे नव्याने बांधकाम होत नाही तोपर्यंत येथील वर्ग जवळच्या सुरक्षित इमारतीत स्थानांतरीत करावे अशी मागणीही झा यांनी केली आहे. महानगरपालिकेने या प्रश्नाकडे गांभिर्याने लक्ष देऊन तोडगा काढला नाही तर विद्यार्थी व त्यांच्या पालकांना सोबत घेऊन आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Web Title: part of the slab of Municipal School collapsed in nagpur; The students and teachers lives are in danger due to negligence of NMC Municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.