नागपुरात पावसाळी नाल्यांची सफाई अर्धवट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 08:58 PM2020-06-04T20:58:14+5:302020-06-05T02:09:58+5:30
शहरातील पावसाळी नाल्या, गडर लाईन स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतल्याचा दावा मनपा प्रशासनाने केला होता. प्रत्यक्षात शहरातील चार हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यालगत असलेल्या पावसाळी नाल्यापैकी जेमतेम ३६९ किलोमीटर लांबीच्या पावसाळी नाल्यातील गाळ व कचरा काढण्यात आला आहे. गडर लाईनचीही कामे अर्धवट आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोव्हिड-१९ चा ससर्ग होऊ नये यासाठी लॉकडाऊन सुरू असल्याने मागील अडीच महिन्यापासून शहरातील बाजारपेठ, दुकाने बंद होती. रस्त्यावर वर्दळ नसल्याने कचऱ्याचे प्रमाण घटल्याने सफाई कर्मचाऱ्याच्या माध्यमातून शहरातील पावसाळी नाल्या, गडर लाईन स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतल्याचा दावा मनपा प्रशासनाने केला होता. प्रत्यक्षात शहरातील चार हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यालगत असलेल्या पावसाळी नाल्यापैकी जेमतेम ३६९ किलोमीटर लांबीच्या पावसाळी नाल्यातील गाळ व कचरा काढण्यात आला आहे. गडर लाईनचीही कामे अर्धवट आहेत.
प्रभाग क्रमांक ३० मधील पावसाळी नाल्यातील कचरा व गाळ काढला जावा, यासाठी प्रभागाचे नगरसेक संजय महाकाळकर यांनी झोन अधिकाऱ्यांना वेळोवेळी सूचना केल्या, परंतु अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. अशीच अवस्था अन्य प्रभागातील आहे. शहरातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या नाल्या गाळ व कचऱ्यामुळे तुंबलेल्या आहेत. यामुळे पावसाळ्यात वस्त्यात पाणी तुंबण्याचा धोका निर्माण झाला आहे.
महापौर व आयुक्तांनी आढावा बैठकीत पावसाळ्यापूर्वी नाल्या व गडर लाईन साफ करण्याचे निर्देश दिले होते. परंतु झोनस्तरावर या निर्देशाची अंमलबजावणी होत नाही. नगरसेवकांनी प्रभागातील तुंबलेल्या नाल्या साफ करण्यास सांगितल्यानंतरही प्रभाग ३० मधील कामे सुरू झालेली नाही, अशी माहिती संजय महाकाळकर यांनी दिली.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी नागपुरातील तीन नद्या, शहरातील नाले आणि पावसाळी नाल्यांची सफाई करण्यात येते. यावर्षी काम वेळेआधी सुरू करण्यात आले असले तरी पावसाळी नाल्याची सफाई झालेली नाही. नाल्याची कामे आठ दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश महापौरांनी दिले होते. पण दहा दिवस झाले तरी परिस्थितीत सुधारणा झालेली नाही, अशी नगरसेवकांची तक्रार आहे.
पावसाळ्यात पाणी तुंबण्याचा धोका
शहरातील पावसाळी नाल्यातील गाळ व कचरा काढण्याची कामे अर्धवट आहेत. यामुळे पावसाळ्याच्या दिवसात शहरात ठिकठिकाणी पाणी तुंबण्याचा धोका आहे. पावसाला सुरुवात झाल्यास गाळ काढणे शक्य न झाल्यास नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे.