महानिर्मितीचा कंत्राटदारांना आंशिक दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:10 AM2021-09-21T04:10:04+5:302021-09-21T04:10:04+5:30
कोराडी: वीज केंद्रात देखभाल-दुरुस्तीसह विविध वार्षिक कामे करणारे कंत्राटदारांना तीन ते चार महिन्यांपासून थकीत असणाऱ्या देयकापैकी महानिर्मितीने केवळ ४० ...
कोराडी: वीज केंद्रात देखभाल-दुरुस्तीसह विविध वार्षिक कामे करणारे कंत्राटदारांना तीन ते चार महिन्यांपासून थकीत असणाऱ्या देयकापैकी महानिर्मितीने केवळ ४० टक्के देयके देऊन कंत्राटदारांच्या आर्थिक जखमांना मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला; परंतु यामुळे कंत्राटदारांची आर्थिक अडचणीत कुठलीही सुधारणा होणार नसल्याने ‘महानिर्मिती’ने कंत्राटदारांना पूर्ण देयके द्यावीत, अशी मागणी कोराडी एमएसईबी कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्यावतीने मुख्य अभियंता प्रकाश खंडारे यांना करण्यात आली आहे. ‘महानिर्मिती’कडे या कंत्राटदारांचे तीन ते चार महिन्यांचे देयके कोरोनाकाळापासून सतत प्रलंबित आहेत. यासंदर्भात वारंवार निवेदने आणि मागणी केल्यानंतरही ‘महानिर्मिती’च्यावतीने मे व जून २०२१ या दोन महिन्यांच्या कालावधीतील एकूण देयकांच्या केवळ ४० टक्के रक्कम या कंत्राटदारांना अदा करण्यात आली. जुलै व ऑगस्ट या महिन्याचे देयके पूर्णपणे थकीत आहेत. असे असताना मे व जून या दोन महिन्याची देयके महानिर्मितीने दिले असले तरी केवळ ४० टक्के रक्कम दिल्याने या रकमेत जीएसटी, ईएसआयसी, कामगारांची भविष्य निर्वाह निधी व नियमित वेतन देताना संबंधित कंत्राटदारांची अडचण होत आहे. एकीकडे जीएसटी, पीएफ व ईएसआयसी न भरल्यास शासनाकडून तत्काळ पत्र कंत्राटदारांना दिले जाते असे असताना ‘महानिर्मिती’ने या सर्व आर्थिक विषयाची बाब लक्षात घेऊन कंत्राटदारांना पूर्ण देयके द्यावीत, अशी मागणी अध्यक्ष रत्नदीप रंगारी यांनी केली आहे.