बौद्ध कायद्यासाठीच्या आंदोलनात सहभागी व्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 12:59 AM2018-06-28T00:59:21+5:302018-06-28T01:10:01+5:30
बौद्धांचा स्वतंत्र कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान येत्या २४ जुलै रोजी आॅल इंडिया अॅक्शन कमिटी फॉर बुद्धिस्ट लॉच्यावतीने संसदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. बौद्ध अनुयायांनी सर्व मतभेद विसरून या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन भदंत ज्ञानज्योती महास्थवीर यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बौद्धांचा स्वतंत्र कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान येत्या २४ जुलै रोजी आॅल इंडिया अॅक्शन कमिटी फॉर बुद्धिस्ट लॉच्यावतीने संसदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. बौद्ध अनुयायांनी सर्व मतभेद विसरून या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन भदंत ज्ञानज्योती महास्थवीर यांनी केले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित बौद्ध धम्म संसदेत ते बोलत होते.
तथागत बुद्ध विहार, वैशालीनगर येथे आयोजित धम्म संसदेत दिल्ली शासनाचे सामाजिक न्यायमंत्री राजेंद्र पाल गौतम, लखनौचे दयाशंकर बौद्ध, अॅक्शन कमिटीचे अध्यक्ष अॅड. मुकुंद खैरे, दिल्लीचे के.पी. चौधरी, डॉ. पी.एस. बौद्ध, प्रा. अशोक वानखेडे, प्रा. प्रमोद मेश्राम, चंद्रमणी शहारे, भदंत महामोग्गलायन, भदंत कमाल धम्मो, भदंत विपश्यी व भिक्खू संघ उपस्थित होते. भदंत ज्ञानज्योती पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ आॅक्टोबर १९५६ ला बौद्ध धम्माची दीक्षा दिली व २२ प्रतिज्ञांचे पालन करण्याचे आवाहन केले. बौद्धांचा स्वतंत्र कायदा नसल्याने सर्व संस्कार १९५५ च्या हिंदू कायद्यानुसार करावे लागतात. अॅक्शन कमिटीने बौद्ध कायद्याचा मसुदा तयार केला असून, केंद्र शासनाने स्वीकृत करून लागू करायचा आहे. मात्र केंद्र शासन बौद्धांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे परत एकदा दिल्लीत संसदेवर आंदोलन करावे लागत आहे. या आंदोलनाचे नेतृत्व आपण स्वत: करणार असल्याचे प्रतिपादन भदंत ज्ञानज्योती यांनी यावेळी केले. हा कायदा बाबासाहेबांच्या विचाराशी पूरक असून त्यांच्या चळवळीला पुढे नेणारा आहे. त्यामुळे बौद्ध अनुयायांनी २४ जुलैला होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी राजेंद्र पाल गौतम म्हणाले, बौद्ध कायद्याची मागणी याआधीच व्हायला हवी होती. मात्र तसे झाले नाही याची खंत आहे. पण उशिरा का होईना हा लढा सुरू झाला आहे व यात एकजुटीने सहभागी व्हावे लागेल. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या आंदोलनात सहभागी होतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. अॅड. मुकुंद खैरे यांनी बौद्ध कायद्याची रूपरेषा समजावून सांगत आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. धम्म संसदेचे संचालन भदंत कुणाल कीर्ती यांनी व प्रास्ताविक प्रदीप फुलझेले यांनी केले. माधवी फुलझेले यांनी आभार मानले.