पक्षांनी ‘कॅश’ केली नोटाबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 01:50 AM2017-11-09T01:50:31+5:302017-11-09T01:50:43+5:30
नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त या निर्णयाच्या समर्थनार्थ व विरोधात शहरात राजकीय कलगीतुरा रंगला. भाजपाने या निर्णयाचे स्वागत करीत ‘आर्थिक विजय दिवस’ साजरा केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त या निर्णयाच्या समर्थनार्थ व विरोधात शहरात राजकीय कलगीतुरा रंगला. भाजपाने या निर्णयाचे स्वागत करीत ‘आर्थिक विजय दिवस’ साजरा केला. तर काँग्रेसने नोटाबंदीने अर्थव्यवस्था डबघाईस झाल्याचा आरोप करीत ‘काळा दिवस’ पाळला. रिपाइं (आ.) समर्थनार्थ तर राष्ट्रवादी काँग्रेस, डावी आघाडी, भारिप बहुजन महासंघ यांच्यासह जय जवान जय किसान संघटनेने कडाडून विरोध केला. या आंदोलनांच्या निमित्ताने नागपूरच्या वाढत्या थंडीत राजकीय पारा चढल्याचे पाहायला मिळाले. एकूणच सर्वच पक्षांनी नोटाबंदी ‘कॅश’ करण्यासाठी शक्ती पणाला लावली. भाजपातर्फे सहाही विधानसभा मतदारसंघात कार्यक्रम आयोजित करून नोटाबंदीचे भक्कमपणे समर्थन करण्यात आले. गटबाजीने ग्रासलेल्या काँग्रेसची नोटाबंदी विरोधातील आंदोलनेही वेगवेगळी झाली. माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार व शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात टेलिफोन एक्सचेंज चौकात आंदोलन झाले. तर माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत, अनिस अहमद आदींनी एकत्र येत संविधान चौकात ‘काळा दिवस’ पाळला.