लसीकरणासाठी भागमभाग ; केंद्रांवर रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:07 AM2021-07-04T04:07:13+5:302021-07-04T04:07:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : चार दिवसांच्या बंदनंतर शहरातील १४३ केंद्रांवर लसीकरण शनिवारी लसीकरण ...

Parts for vaccination; Queues at centers | लसीकरणासाठी भागमभाग ; केंद्रांवर रांगा

लसीकरणासाठी भागमभाग ; केंद्रांवर रांगा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : चार दिवसांच्या बंदनंतर शहरातील १४३ केंद्रांवर लसीकरण शनिवारी लसीकरण सुरू करण्यात आले. सर्वच केंद्रांवर लसीकरणासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. काही केंद्रांवर २५० ते ३०० नागरिक रांगेत उभे होते. परंतु त्या तुलनेत डोस उपलब्ध नव्हते. काही केंद्रांना १०० तर कुठे १७० डोस उपलब्ध करण्यात आले होते. यामुळे अनेक केंद्रांवर लसीकरणाचा गोंधळ उडाला होता. लसीसाठी नागरिकांची सकाळपासून भागमभाग सुरू होती. रांगेत लागूनही अनेकांना डोस न घेता परत जावे लागले. यामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागला.

शुक्रवारी नागपूर शहरासाठी लसी उपलब्ध झाल्याने शनिवारी लसीकरण सुरू राहील, असे मनपा प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आले होते. चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर लसीकरण सुरू झाल्याने नागरिकांनी सकाळी ७ पासून केंद्रांपुढे रांगा लावल्या होत्या. त्यात लसीकरणाची वेळ सकाळी ११ ची जाहीर केली असताना अनेक केंद्रांवर दुपारी १२.३० पर्यंत डोस पोहचले नव्हते. काही केंद्रांवर तर दुपारी १ पर्यंत डोस पोहचले नव्हते. केटीनगर यूपीएचसी येथे लसीकरणासाठी नागरिक सकाळी ६.३० पासून रांगेत असताना येथे दुपारी १२.३० पर्यंत एकाही नागरिकाला लस देण्यात आली नव्हती. तर जगदीश नगर समाज भवन सभागृह येथेही दुपारी १२.४५ पर्यंत डोस पोहचले नव्हते. यामुळे रांगेतील नागरिक संतप्त झाले होते. महाल येथील स्व. प्रभाकरराव दटके रोगनिदान केंद्र, बाभूळखेडा येथील लसीकरण केंद्र, वर्धमाननगर येथील लसीकरण केंद्रावर लसीसाठी नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. ......................... ..

ऑनलाईन व ऑफलाईनचा घोळ

लसीकरणासाठी युवकांनी मोठ्या प्रमाणात ऑनलाईन नोंदणी केली आहे. मागील चार दिवसांपासून लसीकरण बंद असल्याने नोंदणी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दुसरीकडे ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पध्दतीने लसीकरण सुरू आहे. केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करणारे आधी आम्हाला लस द्या, असा आग्रह धरत होते. तर ऑफलाईनवाले आम्ही सकाळपासून रांगेत असल्याने रांगेनुसार लस देण्याचा आग्रह करीत होते. यामुळे अनेक केंद्रांवर गोंधळ उडाला होता. यावर तोडगा म्हणून ५० -५० टक्केचा फाॅर्म्युला अमलात आणला गेला.

....

आज पुन्हा लसीकरण बंद

नागपूर शहरात १८ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाला सुरुवात झाल्याने तरुणांत उत्साह आहे. मात्र मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने लागोपाठ चार दिवस लसीकरण केंद्र बंद होते. शनिवारी लस देण्यात आली. परंतु शनिवारी सायंकाळपर्यंत नवीत लसी उपलब्ध न झाल्याने रविवारी पुन्हा मनपाच्या सर्व केंद्रांवरील लसीकरण बंद राहणार आहे. अशी माहिती मनपा प्रशासनाने दिली आहे.

....

मनपा मुख्यालयापुढे आंदोलन

मनपाकडून १४३ केंद्रांवर लसीकरण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात काही केंद्रांवर लसीकरण सुविधाच नव्हती, तर काही केंद्रांवर दुपारी १२.३० पर्यंतही लसीकरणाला सुरुवात झाली नव्हती. यामुळे प्रत्येक केंद्रावर सुमारे २५० ते ३०० लोकांची गर्दी जमली होती. मनपाच्या या नियोजनशून्य कारभाराविरोधात नागपूर एसओएस (सेव्ह अवल सोल्स)च्या स्वयंसेवकांनी शनिवारी मनपा मुख्यालयापुढे बंटी शेळके आणि तौसीफ खान यांच्या मार्गदर्शनात आणि सागर चव्हाण यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.

....

लसीकरणाचा नवा विक्रम

शहरातील १४३ केंद्रांवर शनिवारी लसीकरण करण्यात आले. चार दिवसांनंतर डोस उपलब्ध झाल्याने केंद्रावर लसीकरणासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. एकाच दिवशी नागपूर शहरात ३०,६९४ लाभार्थींना लस देण्याचा नवा विक्रम करण्यात आला. शासकीय रुग्णालयात २७,६०४ लाभार्थींना तर खासगी रुग्णालयात ३,०८६ लाभार्थींना लस देण्यात आली.

Web Title: Parts for vaccination; Queues at centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.