गुन्हे शाखेकडून पार्टीची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:07 AM2021-06-11T04:07:51+5:302021-06-11T04:07:51+5:30
नागपूर : बदनामीचा धाक दाखवून दोन लाखांची खंडणी उकळण्याच्या प्रयत्नात गुन्हे शाखेच्या कारवाईत अडकलेला त्रिशरण सहारे याने दिलेल्या पार्टीची ...
नागपूर : बदनामीचा धाक दाखवून दोन लाखांची खंडणी उकळण्याच्या प्रयत्नात गुन्हे शाखेच्या कारवाईत अडकलेला त्रिशरण सहारे याने दिलेल्या पार्टीची चाैकशी करण्यासाठी गुन्हे शाखेने गुरुवारी मेयोतील कँटीनमध्ये चाैकशी केल्याची चर्चा आहे.
राजघराण्याशी संबंधित एका जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारात गँगस्टर रणजित सफेलकरच्या खात्यातून लाखोंची रक्कम वळती झाली. या प्रकरणाचे वृत्त प्रकाशित झाल्याने सहारेने खंडणी उकळण्यासाठी सापळा लावला. आरोपी सहारेने विश्वजित किरदत्त यांना फोन करून खंडणीसाठी त्रास देणे सुरू केले. गँगस्टर सफेलकरसोबत तुमचे आर्थिक संबंध असून फोटोसुद्धा आहेत. तुमच्याविरुद्ध सर्व वर्तमानपत्रात बदनामीकारक वृत्त छापून प्रेस रिपोर्टर तुमची बदनामी करतील. ते टाळण्यासाठी तुम्हाला दोन लाखांची खंडणी द्यावी लागेल, असे सहारे याने म्हटले होते. सहारे ब्लॅकमेल करीत असल्याने विश्वजित यांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार नोंदविली. त्यावरून सापळा रचून गुन्हे शाखेच्या पथकाने सहारेच्या मुसक्या बांधल्या. तपासांत सहारेने काही पत्रकारांसाठी पार्टी आयोजित केली होती, हे पुढे आले. ‘लोकमत’ने हे वृत्त ठळकपणे प्रकाशित केले होते. या पार्श्वभूमीवर, डझनभर संबंधितांचे गुन्हे शाखेने जबाब नोंदविले. त्यानंतर गुरुवारी गुन्हे शाखेचे पथक मेयोच्या कँटीनमध्ये पोहोचली. तेथेही अनेकांची पोलिसांनी चाैकशी केल्याची चर्चा आहे.
---