पक्ष म्हणजे चालती गाडी, नवीन चढतात, जुने उतरतात : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 10:04 PM2020-01-25T22:04:11+5:302020-01-25T22:05:28+5:30

पक्ष हा नेहमी चालत्या गाडीसारखा असतो. त्यात नवीन प्रवासी चढत असतात आणि जुने उतरत असतात. तेव्हा निराश न होण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना केले.

Party is a moving train, new ascending, old down: Nitin Gadkari | पक्ष म्हणजे चालती गाडी, नवीन चढतात, जुने उतरतात : नितीन गडकरी

पक्ष म्हणजे चालती गाडी, नवीन चढतात, जुने उतरतात : नितीन गडकरी

Next
ठळक मुद्देज्येष्ठ कार्यकर्ते आनंदराव ठवरे यांचा सत्कार सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रतिकूल परिस्थितीत आनंदराव ठवरे यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी विचाराशी बांधिलकी जपली आणि पक्षाला मजबूत केले. मात्र, वय झाले म्हणजे कार्यकर्ता संपतो असे होत नाही. कार्यकर्ता हा कधीच निवृत्त होत नाही. पक्ष हा नेहमी चालत्या गाडीसारखा असतो. त्यात नवीन प्रवासी चढत असतात आणि जुने उतरत असतात. तेव्हा निराश न होण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना केले.
भारतीय जनता पार्टीच्या शहर व ग्रामीणतर्फे शनिवारी शिक्षक सहकारी बँक सभागृहात पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आनंदराव ठवरे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पक्षाचे शहराध्यक्ष प्रवीण दटके, आ. मोहन मते, आ. कृष्णा खोपडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. सत्ता असली की चांगले दिवस म्हणून आनंद साजरा केला जातो आणि थोडी मरगळही येते. मात्र, चांगल्या काळापेक्षा प्रतिकूल परिस्थितीत काम करण्याचा आनंद जास्त मिळतो. एकेकाळी सतरंज्या उचलण्यापासून ते भाषण ठोकण्यापर्यंत सगळीच कामे आम्ही केली आहेत. त्यावेळी एकही माणूस सभेत नसायचा. मात्र, जिद्द होती आणि त्याच जिद्दीच्या भरवशावर आजचा दिवस बघता येत आहे. कार्यकर्त्यांनी आनंदराव ठवरे यांच्याकडून प्रेरणा घ्यावी आणि जोमाने कामाला लागावे, असे आवाहन नितीन गडकरी यांनी यावेळी केले. संचालन डॉ. राजीव पोतदार यांनी केले तर आभार अरविंद गजभिये यांनी मानले.

मजबूत पायव्याशिवाय कळसाला महत्त्व नाही : देवेंद्र फडणवीस
सत्ता गेली की सर्वच गेले, अशी कार्यकर्त्यांची भावना होते. मात्र मजबूत पायव्याशिवाय कळसाचे महत्त्व नसते, हे समजून घ्यावे. कार्यकर्त्यांनी समर्पित भावनांनी काम करावे आणि पायवा मजबूत करावा. कार्यकर्त्यांनी दीपस्तंभासारखे काम करण्याचे आवाहन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.

माझा काही इतिहास नाही, मला हृदयात ठेवा: आनंदराव ठवरे
माझा स्वत:चाच काहीच इतिहास नाही. माझी विचारांवर श्रद्धा आहे म्हणून पक्षासोबत आहे. मी गेली ५० वर्षे पक्षाचे अहोरात्र काम करतो आहे म्हणून मला पद मिळावे, असे कुठेच लिहून ठेवले नाही. मला केवळ तुमच्या हृदयात ठेवा, अशी भावना आनंदराव ठवरे यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली. कार्यकर्त्यांनी स्वत:ची क्षमता ओळखावी आणि परिस्थितीनुसार दुसऱ्याला पुढे करावे. मला सीट मिळाली नाही म्हणून नाराजी व्यक्त करणारे दुसऱ्या कार्यकर्त्यांवर अन्यायच करीत असतात, असे परखड मतही ठवरे यांनी यावेळी व्यक्त केले.

Web Title: Party is a moving train, new ascending, old down: Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.