CoronaVirus in Nagpur:नागपुरातील पार्वतीनगर नवा हॉटस्पॉट ठरण्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 09:45 PM2020-05-07T21:45:54+5:302020-05-07T22:55:11+5:30

हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुरा व मोमीनपुरानंतर रामेश्वरी, पार्वतीनगर नवा हॉटस्पॉट तर ठरणार नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. मंगळवारी कोरोनाबाधित एका युवकाच्या मृत्यूनंतर हा धोका निर्माण झाला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मृताचे निवासस्थान असलेला परिसर सील करण्यात आला आहे.

Parvatinagar in danger of becoming a new hotspot | CoronaVirus in Nagpur:नागपुरातील पार्वतीनगर नवा हॉटस्पॉट ठरण्याचा धोका

CoronaVirus in Nagpur:नागपुरातील पार्वतीनगर नवा हॉटस्पॉट ठरण्याचा धोका

Next
ठळक मुद्दे२३० लोकांना केले क्वारंटाईन : मनपा प्रशासन सतर्क

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुरा व मोमीनपुरानंतर रामेश्वरी, पार्वतीनगर नवा हॉटस्पॉट तर ठरणार नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. मंगळवारी कोरोनाबाधित एका युवकाच्या मृत्यूनंतर हा धोका निर्माण झाला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मृताचे निवासस्थान असलेला परिसर सील करण्यात आला आहे. बुधवारी रात्री १५० लोकांना तर गुरुवारी ८० अशा २३० लोकांना क्वारंटाईन करण्यात आले. यात प्रामुख्याने मृताच्या कुटुंबीयासह आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांचा समावेश आहे. मृताच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेतला जात आहे. तसेच मृताला कोरोना बाधा कशी झाली याचाही शोध मनपाच्या आरोग्य विभागातील अधिकारी घेत आहेत.

प्रभाग क्रमांक ३५ मध्ये हा भाग येत असून त्यात पार्वतीनगर, जोगीनगर, जयभीमनगर, धारीवाल ले-आऊट, रामेश्वरी, काशीनगर हा भाग येतो. येथील लोकांनी घराबाहेर पडणे बंद केले. अनेक लोकांनी घरे बंद करून शहरातील नातेवाईकांकडे जाणे पसंत केले. काहींनी बुधवारी रात्री बेला, बुटीबोरी, बोरखेडी, हिंगणा, उमरेड, पाचगाव, कुही, सिर्र्सी, गुमगाव, डोंगरगाव, कामठी, कन्हान, कोराडी, कळमेश्वर, टाकळघाट आदी गावात धाव घेतल्याची माहिती आहे.

झोपडपट्ट्याबाबत सतर्कतेची गरज
कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रादुर्भाव होऊ नये यासाठी हॉटस्पॉट ठरलेल्या परिसरासह इतरही भागातील झोपडपट्ट्यांवर प्रशासनाकडून लक्ष केंद्रित करून सतर्कता बाळगण्याची गरज आहे. स्लम भागातील लोकांचा बाहेर वाढलेला वावर बघता या ठिकाणी सुरक्षेसाठी कठडे लावून परिसर बंद केले जात असून नागरिकांना बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. शहरात ४२४ झोपडपट्ट्या असून यातील २९३ नोंदणीकृत तर १३१ अघोषित आहेत. त्यातील बहुतांश या मध्य, पूर्व व दक्षिण नागपुरात आहे. सतरंजीपुरा आणि मोमीनपुरा या हॉटस्पॉट ठरलेल्या परिसराला लागून मध्य व पूर्व नागपुरात ५८ झोपडपट्ट्या आहेत.

कोरोनाबाधितावर प्रथमच अग्निसंस्कार
उपराजधानीत मंगळवारी दगावलेल्या पार्वतीनगर येथील २२ वर्षीय कोरोनाग्रस्ताचा अंत्यविधी बुधवारी मोक्षधाम घाट येथे दहनविधीतून करण्यात आला. पूर्वी शहरातील सतरंजीपुरा आणि मोमीनपुरा परिसरातील प्रत्येकी एक अशा दोघांचा अंत्यविधी दफनविधीतून करण्यात आला होता. महापालिकेच्या आरोग्य विभागाने संसर्गाचा धोका सांगितल्यामुळे अंत्यविधीसाठी केवळ तीनच नातेवाईक मोक्षधाम घाटावर पोहचले, तर महापालिकेचेही निवडक अधिकारी खबरदारी म्हणून येथे उपस्थित होते. त्यानंतर येथे दाहसंस्कार झाले.

Web Title: Parvatinagar in danger of becoming a new hotspot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.